Airfare Price Hike Pudhari
राष्ट्रीय

Airfare Price Hike: विमानप्रवास महागला! तिकीट दरात २५ ते ३० टक्क्यांनी वाढ; पर्यटकांचे बजेट कोलमडले, वाढीचे कारण काय?

Airfare Hike in India: उन्हाळी सुट्टी आणि वाढत्या प्रवासी मागणीमुळे देशांतर्गत विमान तिकीट दरात २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबईहून लेह, धर्मशाळा, देहराडून आणि बागडोगरा मार्गावरील विमानप्रवास आता अत्यंत महाग झाला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Airfare Hike in India: उन्हाळी सुट्टी सुरू होताच देशभरातील पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याचा थेट परिणाम विमान प्रवासाच्या तिकीट दरांवर झाला असून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान भाड्यात तब्बल २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. वाढती प्रवासी मागणी, इंधन दरवाढ आणि पर्यटन हंगाम यामुळे विमान कंपन्यांनी तिकीटदर वाढवल्याने प्रवाशांच्या खिशाला मोठी कात्री लागत आहे.

विशेषतः गोवा, हिमाचल प्रदेश, काश्मीर, लेह-लडाख, उत्तराखंड आणि दक्षिण भारतातील पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फटका बसत आहे. उन्हाळ्याच्या वाढत्या उकाड्यामुळे महाराष्ट्रातील पर्यटक थंड हवेच्या ठिकाणी फिरण्यासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहेत. त्यामुळे विमानप्रवासाची मागणी वाढली आहे.

मे महिना सर्वाधिक गर्दीचा काळ

मे महिना हा हवाई प्रवासासाठी वर्षातील सर्वाधिक गर्दीचा काळ मानला जातो. जूनच्या मध्यापर्यंत सुरू राहणाऱ्या पर्यटन हंगामामुळे विमान कंपन्यांवर अतिरिक्त ताण वाढला आहे. रेल्वे किंवा रस्तेमार्गे हिमाचल, काश्मीर किंवा लेह-लडाख येथे पोहोचण्यासाठी ३० तासांपेक्षा अधिक वेळ लागत असल्याने अनेक पर्यटक विमान प्रवासाला प्राधान्य देत आहेत. यामुळे तिकीटांचे दर झपाट्याने वाढत आहेत.

एका तिकिटासाठी तब्बल २४ ते २५ हजार रुपये

मुंबईहून लेह-लडाखला जाणाऱ्या प्रवाशांना आता एका तिकिटासाठी तब्बल २४ ते २५ हजार रुपये मोजावे लागत आहेत. काही महिन्यांपूर्वी हेच तिकीट तुलनेने कमी दरात उपलब्ध होत होते. त्याचप्रमाणे उत्तराखंडमधील पर्यटनस्थळांसाठी देहराडून हे प्रमुख विमानतळ असल्याने मुंबई-देहराडून मार्गावरील तिकीट दरही प्रचंड वाढले आहेत. पूर्वी सहा ते सात हजार रुपयांत मिळणारे तिकीट आता थेट २१ हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहे.

पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ दार्जिलिंगला जाणाऱ्या पर्यटकांनाही वाढीव दरांचा फटका बसत आहे. दार्जिलिंगसाठी बागडोगरा विमानतळावर उतरावे लागते. मुंबई-बागडोगरा विमान प्रवासासाठी पूर्वी साधारण पाच हजार रुपये खर्च येत होता. मात्र सध्या हेच तिकीट १८ हजार रुपयांपर्यंत गेले आहे.

हिमाचल प्रदेशातील शिमला, मनाली, कुलू आणि डलहौसी या लोकप्रिय पर्यटनस्थळांसाठी धर्मशाळा हे महत्त्वाचे विमानतळ मानले जाते. सध्या मुंबई-धर्मशाळा विमानप्रवासासाठी प्रवाशांना तब्बल ३० ते ३१ हजार रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे कुटुंबासह पर्यटनाचा बेत आखणाऱ्यांच्या बजेटवर मोठा परिणाम होत आहे.

विमान कंपन्यांच्या मते, वाढती प्रवासी संख्या, एव्हिएशन टर्बाइन फ्युएलचे वाढलेले दर आणि पर्यटन हंगामामुळे तिकीटांचे दर वाढले आहेत. आगामी काही आठवडे ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अनेक प्रवासी आता आगाऊ बुकिंग किंवा पर्यायी पर्यटनस्थळांचा विचार करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT