Air India flight turbulence 
राष्ट्रीय

Air India pilot sacked : अखेर 'नशेखोर' पायलटवर एअर इंडियाची कुऱ्हाड; 'टर्ब्युलन्स' प्रकरणी AAIB च्या अहवालानंतर हकालपट्टी

फुकेत-दिल्ली विमान प्रवासादरम्यान ड्रग्ज घेतल्याचे झाले होते निष्पन्न

पुढारी वृत्तसेवा

Air India Phuket Delhi turbulence case: मागील महिन्यात फुकेतवरून नवी दिल्लीला येणाऱ्या विमानात झालेल्या 'टर्ब्युलन्स' प्रकरणी एअर इंडियाने मोठी कारवाई केली आहे. या घटनेला जबाबदार असलेल्या नशेखोर मुख्य वैमानिकाला (Pilot-in-Command) विमान कंपनीने नोकरीवरून बडतर्फ केले आहे.

मुख्य वैमानिकाला सेवेतून बडतर्फ

एअर इंडियाने शुक्रवारी एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले की, ४ ऑगस्ट रोजीच्या फुकेत-दिल्ली उड्डाणाच्या मुख्य वैमानिकाला सेवेतून कमी करण्यात आले आहे. या उड्डाणादरम्यान क्रूझिंगच्या वेळी विमानाची उंची अचानक कमी झाली होती, ज्यामुळे २० प्रवासी आणि ४ क्रू मेंबर्ससह एकूण २४ जण जखमी झाले होते.

एअर इंडियाने 'टर्ब्युलन्स' प्रकरणी अहवाल केला सादर

तत्पूर्वी, एअर इंडियाचे हे विमान हवेत अचानक खाली आल्याच्या भयंकर घटनेबाबत 'विमान अपघात तपास ब्युरो'ने (AAIB) शुक्रवारी आपला प्राथमिक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालानुसार, मुख्य वैमानिकाची प्राथमिक तपासणी आणि रक्ताच्या नमुन्यांच्या प्रयोगशाळेतील चाचणीत त्याने ड्रग्ज (अमली पदार्थ) सेवन केल्याचे स्पष्ट झाले आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी सूचना तपास ब्युरोने 'नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला' (DGCA) दिली आहे. तसेच, आरोपी पायलटवर कठोर कारवाई करण्याची शिफारसही AAIB ने आपल्या अहवालात केली होती.

तिन्ही हायड्रोलिक सिस्टीम झाल्या होत्या फेल

अहवालातून असेही समोर आले की, त्या दिवशी एअर इंडियाच्या AI 2379 या विमानाची 'ग्रीन' (Green) हायड्रॉलिक प्रणाली सर्वप्रथम निकामी झाली. त्यानंतर 'ब्लू' (Blue) आणि 'येलो' (Yellow) या हायड्रॉलिक प्रणालीही निकामी झाल्या. तिन्ही हायड्रॉलिक प्रणाली निकामी झाल्यामुळे विमानाचे 'ऑटोपायलट' (स्वयंचलित नियंत्रण प्रणाली) आपोआप बंद पडले. त्यानंतर सह-वैमानिकाने (को-पायलट) विमान नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला, परंतु मुख्य वैमानिकाने (कॅप्टन) नियंत्रणे स्वतःच्या हातात घेतली. या घटनाक्रमादरम्यान, विमान आधी ३७२ फूट वर गेले आणि त्यानंतर २९२ फूट खाली आले. AAIB च्या तपासणीत विमानातील 'कॅबिन'च्या आत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे आढळून आले; यामध्ये अनेक आसनांचे 'हेडरेस्ट्स', डोक्यावरील सामानाचे कप्पे (ओव्हरहेड बिन्स), प्रसाधनगृहातील कपाटे आणि विमानाचे छत यांचे नुकसान झाले.

सखोल तपास सुरू

विशेष म्हणजे, या घटनेत केबिन क्रू सदस्यांसह एकूण २४ जण जखमी झाले. दिल्ली विमानतळावर विमान उतरल्यानंतर प्रवाशांना वैद्यकीय मदत पुरवण्यात आली. विमानात १३७ प्रवासी आणि आठ क्रू सदस्य (तीन लहान मुलांसह) होते. जखमी झालेल्या २४ जणांपैकी २० जणांना प्रथमोपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले, तर चौघांना गंभीर दुखापतींमुळे अधिक काळ रुग्णालयात राहावे लागले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे AAIB ने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT