Air India flight turbulence 
राष्ट्रीय

Air India Flight Turbulence : दुसऱ्या चाचणीत मुख्य पायलटने 'गांजा' सेवन केल्‍याचे निष्पन्न; २५ जण झाले होते जखमी

४ ऑगस्ट रोजी झालेल्या या घटनेनंतर दोन्ही वैमानिकांची झाली होती 'सायकोॲक्टिव्ह सबस्टन्स' चाचणी

पुढारी वृत्तसेवा

Air India Flight Turbulence : फुकेतवरून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाची हवेत अचानक ३०० फूट उंची घसरून २५ जण जखमी झाल्याच्या दुर्घटनेत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. रिपोर्टनुसार, या विमानाच्या मुख्य वैमानिकाची (पायलट-इन-कमांड) दुसरी (कन्फर्मेटरी) डोप चाचणी पॉझिटिव्ह आली असून, त्याने 'गांजा' सेवन केल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालात निष्पन्न झाले आहे.

दोन्ही वैमानिकांना हटवले

४ ऑगस्ट रोजी झालेल्या या घटनेनंतर दोन्ही वैमानिकांची 'सायकोॲक्टिव्ह सबस्टन्स' चाचणी करण्यात आली होती. यामध्ये को-पायलटची चाचणी निगेटिव्ह आली, तर मुख्य पायलटचा प्राथमिक अहवाल संशयास्पद आढळल्याने नमुने विशेष प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. सध्या दोन्ही वैमानिकांना उड्डाण कर्तव्यावरून हटवण्यात आले आहे.

हवेत ३०० फूट खाली आले होते विमान

एअर इंडियाच्या 'AI2379' (Airbus A320) या विमानात १३७ प्रवासी आणि ८ कर्मचारी उपस्थित होते. प्रवासादरम्यान अचानक विमानाची उंची ३०० फुटांनी घटल्याने २० प्रवासी आणि ४ केबिन क्रू सदस्य जखमी झाले. या घडामोडीनंतर वैमानिकांनी विमानावर नियंत्रण मिळवत दिल्लीत सुरक्षित लँडिंग केले.

तांत्रिक बिघाड की मानवी चूक? AAIB कडून तपास सुरू

विमान अपघात तपास संस्था (AAIB) सर्व तांत्रिक, वैद्यकीय आणि मानवी घटकांची चौकशी करत आहे. उड्डाणादरम्यान ऑटोपायलट बंद पडणे आणि हायड्रॉलिक यंत्रणेत बिघाड झाल्याचा संशय असून, को-पायलटने मॅन्युअल पद्धतीने विमान नियंत्रित केले होते. आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलनुसार फ्रान्सची 'BEA' संस्था आणि एअरबसचे तांत्रिक प्रतिनिधीही या तपासात मदत करत आहेत.

एअर इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना समन्स

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरी उड्डयन मंत्री के. राममोहन नायडू आणि वरिष्ठ डीजीसीए अधिकाऱ्यांनी एअर इंडियाचे मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) कॅम्पबेल विल्सन यांना मंत्रालयात पाचारण करून सुरक्षा उपायांचा आढावा घेतला. एअर इंडियाने तपासात पूर्ण सहकार्य करत असल्याचे स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT