Air India flight turbulence 
राष्ट्रीय

Air India Flight Turbulence : वैमानिक ड्रग्स टेस्टमध्ये पॉझिटिव्ह? फुकेत-दिल्ली फ्लाईट 'टर्ब्युलन्स' प्रकरणात मोठा खुलासा!

विमान अचानक आले होते तब्‍बल ३०० फूट खाली, अनेक प्रवाशांसह कर्मचारी झाले होते जखमी

पुढारी वृत्तसेवा

Air India flight turbulence : ४ ऑगस्ट रोजी फुकेटहून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात झालेल्या भीषण टर्ब्युलन्सप्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या विमानाच्या कॅप्टनची 'डोप टेस्ट' (नशा चाचणी) पॉझिटिव्ह आली असून, ते अंमली पदार्थांचे (सायकोॲक्टिव्ह ड्रग्ज) सेवन केल्याचे चाचणीत निष्पन्न झाले आहे. या घटनेत हवेत तीव्र टर्ब्युलन्स निर्माण झाल्याने विमान अचानक तब्बल ३०० फूट खाली आले होते, ज्यामध्ये अनेक प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना दुखापत झाली आहे.

वैमानिकाची झाली डोप चाचणी

विमान दिल्लीत उतरल्यानंतर वैमानिकाची ही डोप टेस्ट करण्यात आली. मात्र, एअर इंडियाने या पॉझिटिव्ह अहवालाला अधिकृत दुजोरा दिलेला नाही किंवा तो फेटाळलेलाही नाही. उड्डाणानंतरच्या (पोस्ट-फ्लाइट) स्क्रीनिंगचे निकाल अद्याप कंपनीसोबत शेअर करण्यात आलेले नाहीत, असे एअरलाइनने स्पष्ट केले आहे.

एअर इंडिया काय म्‍हणाले?

या संदर्भात एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, "लागू नियमांनुसार वैमानिकांची उड्डाणानंतर चाचणी घेण्यात आल्याची आम्हाला माहिती आहे. मात्र, याचे निकाल एअर इंडियाला प्राप्त झालेले नसल्याने आम्ही यावर भाष्य करू शकत नाही. एअर इंडिया नागरी उड्डाण नियमांनुसार क्रू मेंबर्सची नियमित ड्रग्ज टेस्ट करत असते आणि आवश्यकतेनुसार संबंधित अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य केले जाईल." या विमानात १३७ प्रवासी आणि ८ क्रू मेंबर्स होते.

काही कर्मचार्‍यांच्‍या मणक्‍यासह मानेला गंभीर दुखापती

दरम्यान, नागरी उड्डाण मंत्री के. राममोहन नायडू यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, ४ ऑगस्ट रोजी फुकेटहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला हवेत ४ ते ५ मिनिटे तीव्र टर्ब्युलन्सचा (हवाई अस्थिरता) सामना करावा लागला. त्यामुळे विमान अचानक ३०० फूट खाली आले. या अपघातात क्रू मधील सदस्यांसह किमान १७ जण जखमी झाले. काही कर्मचाऱ्यांच्या पाठीच्या मणक्याला आणि मानेला गंभीर दुखापत झाली आहे.

१३ प्रवासी आणि ४ क्रू मेंबर्स झाले होते रुग्णालयात दाखल

घटनेनंतर १३ प्रवासी आणि ४ क्रू मेंबर्सना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उड्डाणादरम्यान प्रतिकूल परिस्थितीतही क्रू मेंबर्सनी प्रवाशांना मदत करून धैर्याचे दर्शन घडवल्याचे सांगत मंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले. सध्या नागरी उड्डाण महासंचालनालय (DGCA) या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT