Air India flight Pakistan : भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण संबंधांमुळे सामान्यतः भारतीय विमानांसाठी पाकिस्तानची आणि पाकिस्तानी विमानांसाठी भारताची हवाई हद्द बंद असते. मात्र, सोमवारी (दि. २२) रात्री घडलेल्या एका घटनेमुळे सर्वांचीच धाकधूक वाढली. दिल्लीहून अमृतसरसाठी निघालेले एअर इंडियाचे 'AI-321' हे विमान रस्ता भरकटल्याने थेट पाकिस्तानी हवाई हद्दीत दाखल झाले. यानंतर पाकिस्तानच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलने (ATC) इशारा देत विमानाला तात्काळ मागे फिरण्यास सांगितले. या घटनेची माहिती नियामक प्राधिकरणांना देण्यात आली असून, त्याबाबत अंतर्गत तपास सुरू आहे असे एअर इंडियाने म्हटलं आहे.
अहवालानुसार, एअर इंडियाच्या एअरबस AI-321 ने सोमवारी रात्री सुमारे ९:१८ वाजता नवी दिल्लीहून अमृतसरसाठी उड्डाण केले होते. परंतु, मार्ग चुकल्यामुळे हे विमान पाकिस्तानात पोहोचले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या एअर ट्रॅफिक अथॉरिटीकडून कंट्रोल सिस्टमवर जेव्हा चेतावणीचे मेसेज येऊ लागले, तेव्हा पायलटला आपण पाकिस्तानच्या हद्दीत असल्याचा अंदाज आला. त्यानंतर स्थानिक एअर ट्रॅफिक कंट्रोलने विमानाला दिल्लीला परतण्याचे निर्देश दिले आणि विमान दिल्लीला परत आले.
नवी दिल्लीहून निघालेले हे विमान अवघ्या एका तासात अमृतसरला पोहोचणार होते, मात्र रस्ता चुकल्याने ते पाकिस्तानात गेले. या गोंधळानंतर रात्री सुमारे ११:३० च्या सुमारास विमान पुन्हा दिल्लीत सुरक्षित उतरवण्यात आले. तिथे सुमारे २ तास विमानाची कसून तपासणी केल्यानंतर त्याला पुन्हा उड्डाण करण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर उशिरा रात्री सुमारे २:२० वाजता हे विमान अमृतसरच्या 'श्री गुरु रामदास जी आंतरराष्ट्रीय विमानतळावर' उतरले. विमानतळ प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, उड्डाणादरम्यान विमानातील नेव्हिगेशन सिस्टीममध्ये (दिशादर्शक यंत्रणा) बिघाड झाला होता, ज्यामुळे विमान रस्ता भरकटले.
विमानतळ अधिकारी भूपेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे विमान पाकिस्तानच्या हवाई हद्दीत सुमारे दीड मैल आतपर्यंत गेले होते. ही एक छोटी तांत्रिक घटना असून अशी चूक होणे असामान्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, 'पाकिस्तानमधून परतत असताना विमान अमृतसरलाच का उतरवण्यात आले नाही?' असा प्रश्न विचारला असता, "परत येत असताना विमान हवेत स्थिर होऊ शकले नव्हते, त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव त्याला आधी दिल्लीला पाठवण्यात आले," असे सिंह यांनी सांगितले. दरम्यान भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांमधील तणावामुळे दोन्ही देशांमध्ये थेट हवाई संपर्क नाही. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांनी एकमेकांच्या हवाई हद्दीच्या वापरावर बंदी घातली आहे. यामुळे दोन्ही देशांतील विमानांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागतो.