Air India AI-159 Cancelled  file photo
राष्ट्रीय

Air India AI-159 Cancelled | बोईंग ड्रीमलाइनरमध्ये बिघाड, तांत्रिक त्रुटीमुळे अहमदाबादहून लंडनकडे जाणारी एअर इंडियाची AI-159 फ्लाइट रद्द

अहमदाबादहून लंडनकडे जाणारी एअर इंडिया AI-159 ही आंतरराष्ट्रीय विमान सेवा मंगळवारी अचानक रद्द करण्यात आली.

shreya kulkarni

Air India AI-159 Cancelled

अहमदाबादहून लंडनकडे जाणारी एअर इंडिया AI-159 ही आंतरराष्ट्रीय विमान सेवा मंगळवारी अचानक रद्द करण्यात आली. या निर्णयामागे विमानात उड्डाणापूर्वी आढळलेल्या तांत्रिक बिघाडाचे कारण असल्याचे सांगण्यात आले आहे.

ही फ्लाइट अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दुपारी १.१० वाजता लंडन गॅटविककडे रवाना होणार होती. मात्र, टेकऑफच्या काही तास आधीच इंजिन संबंधित यंत्रणेत तांत्रिक अडचण आढळून आली. त्यामुळे प्रारंभी दोन तासांचा विलंब जाहीर करण्यात आला. तथापि, यंत्रणेतील बिघाड गंभीर असल्याचे समजल्यानंतर अखेरीस फ्लाइट रद्द करण्यात आली.

या घटनेमुळे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी पसरली. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, त्यांना वेळेवर न समजावून सांगितल्यामुळे संभ्रम निर्माण झाला. सुरुवातीला केवळ विलंबाची माहिती देण्यात आली होती, पण नंतर अचानक विमान रद्द झाल्याचे सांगितल्यामुळे अनेक प्रवासी अस्वस्थ झाले. एअर इंडियाकडून पर्यायी फ्लाइट किंवा हॉटेलमध्ये थांबण्याची स्पष्ट माहितीही दिली गेली नाही, असा आरोप काही प्रवाशांनी केला आहे.

AI-159 ही सेवा बोईंग 787-8 ड्रीमलाइनर या प्रगत तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या विमानाद्वारे दिली जाणार होती. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी याच मार्गावर AI-171 या विमानाच्या अपघाताची घटना घडली होती. त्यामुळे आधीच चिंता व्यक्त केली जात होती. आता या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत आणि एअर इंडियाच्या देखभाल व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

एअर इंडियाकडून अद्याप या प्रकरणाबाबत अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. प्रवाशांना परतावा कधी मिळणार, किंवा पुढील प्रवासाची काय सोय केली जाणार, याबाबतही अनिश्चितता आहे. त्यामुळे या घटनेमुळे भारतातील विमान सेवांच्या तांत्रिक गुणवत्तेवर आणि ग्राहक सेवा व्यवस्थापनावरही नव्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT