Asaduddin Owaisi all party meet about Pahalgam terror attack
नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतर केंद्र सरकारने गुरुवारी एक सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.
मात्र, या बैठकीसाठी पात्रता मर्यादा ठेवल्यामुळे फक्त अशा पक्षांनाच बोलावण्यात आले आहे ज्यांचे लोकसभा किंवा राज्यसभेत किमान पाच खासदार आहेत.
या निकषामुळे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाला या बैठकीतून वगळण्यात आले आहे. या पक्षाचे नेतृत्व हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी करतात. या निर्णयावर टीका करताना खा. ओवैसी यांनी याला "अलोकशाही निर्णय" असे संबोधले आहे.
ओवैसी म्हणाले, "पहलगामवरील सर्वपक्षीय बैठकीबाबत मी बुधवारी रात्री किरेन रिजिजू यांच्याशी बोललो. त्यांनी सांगितले की, केवळ 5 किंवा 10 खासदार असलेले पक्षच बोलावण्याचा विचार सुरू आहे.
जेव्हा मी विचारले, 'कमी खासदार असलेले पक्ष का नाही?' तेव्हा त्यांनी उत्तर दिले की, बैठक खूप लांबेल. मी विचारले, 'आमच्यासारखे छोटे पक्ष?' तर ते म्हणाले की, तुमचा आवाज तर तसाही खूप मोठा आहे!"
ओवैसी यांनी पुढे म्हटले, "तुमच्या स्वतःच्या पक्षाकडेही बहुमत नाही. मग एखाद्या पक्षाकडे 1 खासदार असो वा 100 हे दोघेही भारतीय लोकांनी निवडले आहेत आणि त्यामुळे अशा राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर त्यांचं म्हणणं ऐकून घेणं आवश्यक आहे. हा राजकीय नाही तर राष्ट्रीय मुद्दा आहे.
ओवैसी म्हणाले, प्रत्येकाला ऐकून घेतलं पाहिजे. मी नरेंद्र मोदी यांना विनंती करतो की ही खरी सर्वपक्षीय बैठक व्हावी. संसदेत एक खासदार असलेल्या प्रत्येक पक्षाला यामध्ये आमंत्रित केलं पाहिजे."
"ही केवळ भाजपची किंवा इतर कुठल्याही पक्षाची अंतर्गत बैठक नाही. ही सर्वपक्षीय बैठक आहे, जी दहशतवाद आणि दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या देशांविरोधात एकजूट आणि ठाम संदेश देण्यासाठी बोलावली गेली आहे," असेही ओवैसी यांनी स्पष्ट केले.
या बैठकीत केंद्र सरकार विविध पक्षांच्या नेत्यांना पहलगाम हल्ल्याबाबत माहिती देईल आणि त्यांच्या सूचना ऐकून घेईल.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शहा या बैठकीत नेत्यांना माहिती देतील, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. ही बैठक राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
दरम्यान, यापुर्वी 2019 मधील पुलवामा हल्ला किंवा 2020 मधील भारत-चीन संघर्ष यानंतर केंद्र सरकारने अशाच प्रकारच्या सर्वपक्षीय बैठकांचे आयोजन केले होते.