पुढारी ऑनलाईन डेस्क: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही दिवसांपुर्वी तामिळनाडूतून 'द्रमुक'चा सुपडासाफ करणार, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर आता शुक्रवारी (11 एप्रिल, 2025) अमित शहा तामिळनाडू दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी पुढील वर्षी होणाऱ्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिला डाव टाकला आहे.
शहा यांनी अण्णाद्रमुक आणि भाजप आघाडीची घोषणा केली. ही आघाडी एकत्रितरित्या निवडणुकांना सामोरे जाईल. यावेळी अण्णाद्रमुकचे नेते पलानीस्वामी आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई सोबत होते. दरम्यान, आघाडीचे नेतृत्व पलानीस्वामींकडे असेल, असेही शहा म्हणाले. (AIADMK BJP Alliance)
शहा म्हणाले, राष्ट्रीय स्तरावरील निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जातील, तर तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या नेतृत्वाखाली लढवण्यात येणार आहेत. पंतप्रधान मोदी आणि तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांनी अनेक वर्षे राष्ट्रीय राजकारणात एकत्र काम केले आहे. आम्हाला काहीही संभ्रम निर्माण करायचा नाही.
आम्ही पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार आहोत. मला पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या निवडणुकीत एनडीए (NDA) प्रचंड बहुमताने विजयी होईल आणि तामिळनाडूमध्ये एनडीएचे सरकार स्थापन होईल.
'डीएमकेला घोटाळ्यांचं उत्तर द्यावंच लागेल'
गृहमंत्री अमित शहा म्हणाले, तामिळनाडूमध्ये डीएमके पक्ष सनातन धर्म, तीन भाषा धोरण (थ्री लँग्वेज पॉलिसी) आणि इतर अनेक मुद्दे पुढे करत आहे, ज्याचा उद्देश लोकांचे लक्ष खऱ्या मुद्द्यांपासून विचलित करणे हा आहे.
आगामी निवडणुकीत तामिळनाडूची जनता द्रमूक सरकारच्या प्रचंड भ्रष्टाचारावर, कायदा-सुव्यवस्थेच्या बिघडलेल्या स्थितीवर, दलित आणि महिलांवरील अत्याचाराच्या प्रश्नावरून मतदान करणार आहे.
द्रमुक सरकारने 39000 कोटी रुपयांचा मद्य (दारू) घोटाळा, वाळू उत्खनन घोटाळा, ऊर्जा घोटाळा, मोफत धोती योजनेतील भ्रष्टाचार, परिवहन विभागातील घोटाळा असे अनेक घोटाळे केले. आम्ही हे मुद्दे घेऊन जनतेसमोर जाणार आहोत.
तामिळनाडूची जनता द्रमूककडून उत्तर मागणार आहे. ही नवीन युती आता कायमस्वरूपी राहणार आहे, म्हणूनच यामध्ये थोडा वेळ लागला. भाजप तामिळ भाषेचा गौरव करतो. पंतप्रधान मोदींनीच संसदेत 'संगोल' स्थापित केला.
राज्याध्यक्ष पदासाठी बुधवारी केवळ नागेन्द्रन यांनीच उमेदवारी अर्ज भरल्याने त्यांची निवड बिनविरोध झाली. त्यांच्या नावाची औपचारिक शिफारस विद्यमान प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी केली, तर पक्षाच्या इतर वरिष्ठ नेत्यांनी त्यास अनुमोदन दिले.
तिरुनेलवेली येथून भाजपचे आमदार असलेले नागेन्द्रन यांचा राजकीय प्रवास अण्णा द्रमुकपासून सुरू झाला होता. राज्याध्यक्षपदासाठी साधारणतः आवश्यक असलेल्या दहा वर्षांच्या प्राथमिक सदस्यत्वाऐवजी नागेन्द्रन यांनी भाजपमध्ये फक्त आठ वर्षे घालवली असली, तरी पक्षामध्ये याआधीही धोरणात्मक कारणांसाठी अपवाद करण्यात आलेले आहेत.
नागेन्द्रन हे मुक्कुलथोर (मरावर) या समाजातून येतात. अण्णा द्रमुक नेतृत्वात त्यांची स्वीकृती ही भाजपसाठी फायद्याची ठरू शकते.