राष्ट्रीय

Zoho No Salary Hike : ‘यंदा पगारवाढ नाही, माफ करा’ : AI चे कारण देत IT कंपनी Zoho च्या संस्थापकांचा माफीनामा

zoho sridhar vembu : आम्हाला तुमच्या साथीची आणि प्रार्थनेची गरज! वेतनवाढ रद्द करताना झोहोचे प्रमुख श्रीधर वेम्बू यांचे डोळे पाणावले

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : वाढत्या महागाईच्या काळात नोकरदारांसाठी वार्षिक वेतनवाढ हा मोठा आधार असतो. मात्र, प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी 'झोहो'च्या (Zoho) कर्मचाऱ्यांना यंदा मोठ्या निराशेचा सामना करावा लागणार आहे. कंपनी यंदा कर्मचाऱ्यांचे नियमित मूल्यमापन (अप्रेझल) आणि वार्षिक वेतनवाढ करणार नाही, अशी घोषणा झोहोचे संस्थापक श्रीधर वेम्बू यांनी केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वाढता खर्च, डेटा सेंटरमधील सर्व्हरच्या गगनाला भिडलेल्या किमती आणि जागतिक पातळीवरील आर्थिक अनिश्चिततेमुळे हा कठोर निर्णय घ्यावा लागल्याचे स्पष्ट करत, वेम्बू यांनी कर्मचाऱ्यांची जाहीर माफी मागितली आहे.

सामूहिक कर्मचारी कपातीचा धोका टाळण्यासाठी निर्णय

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर (पूर्वीचे ट्विटर) सविस्तर माहिती देताना वेम्बू यांनी सांगितले की, सध्या संपूर्ण सॉफ्टवेअर उद्योग एका अत्यंत आव्हानात्मक टप्प्यातून जात आहे. कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळू नये, यासाठीच नियमित वेतनवाढ स्थगित करण्याचा कटू निर्णय घेण्यात आला आहे. "यंदा आम्ही नेहमीप्रमाणे वेतनवाढ देऊ शकत नाही. हा निर्णय घेणे सोपे नव्हते, यासाठी मी कर्मचाऱ्यांची मनापासून माफी मागतो," अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच कंपनीच्या या कठीण काळात परिस्थिती समजून घेतल्याबद्दल त्यांनी सहकाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

सर्व्हरच्या किमती चौपट; खर्चावर नियंत्रणासाठी काटकसर

कंपनीसमोर उभ्या ठाकलेल्या आर्थिक आव्हानांचा पाढा वाचताना वेम्बू यांनी नमूद केले की, एआय टूल्सचा वाढता वापर आणि डेटा सेंटरसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व्हरच्या किमतींमध्ये तब्बल चार पटींनी वाढ झाली आहे. याआधी ऑगस्ट २०२६ मध्येही त्यांनी तांत्रिक खर्चाबद्दल चिंता व्यक्त करताना नमूद केले होते की, मेमरीच्या किमतीत ५०० टक्क्यांनी वाढ झाली असून मेमरी व एआय टोकन्सच्या प्रचंड खर्चामुळे व्यवसाय चालवणे कठीण झाले आहे. या वाढत्या खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी झोहोने आपल्या विपणन (मार्केटिंग) बजेटमध्ये मोठी कपात केली आहे. तसेच ग्राहकांवर हा भार न टाकता स्वतःच्या पातळीवरच तो सोसण्याचा प्रयत्न कंपनी करत आहे. याशिवाय सध्याच्या जागतिक भू-राजकीय घडामोडींनीही व्यवसायापुढील अडचणींमध्ये भर घातली आहे.

मागील १८ महिन्यांपासून भरती ठप्प; टेक क्षेत्रात अनिश्चितता

सॉफ्टवेअर क्षेत्रात नोकऱ्यांचे भवितव्य सध्या धोक्यात असल्याचे सांगताना त्यांनी स्पष्ट केले की, झोहोने गेल्या १८ महिन्यांत कर्मचारी संख्येत कोणतीही वाढ केलेली नाही, ज्यामुळे कंपनीतील भरती प्रक्रिया मंदावल्याचे स्पष्ट होते. मागील वर्षभरात झोहोचे 'अरट्टाई' (Arattai) हे मेसेजिंग ॲप चर्चेत राहिले असले, तरी कंपनीला इतर बड्या टेक कंपन्यांप्रमाणेच एआयच्या आर्थिक भाराचा फटका बसत आहे. सध्या संपूर्ण तंत्रज्ञान क्षेत्र संकटात असून गुगल, ओरॅकल, मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन आणि टीसीएस यांसारख्या आघाडीच्या कंपन्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात झाली आहे. 'Layoffs.fyi' या संकेतस्थळाच्या आकडेवारीनुसार, एकट्या २०२६ या वर्षात आतापर्यंत १.३१ लाखांहून अधिक तंत्रज्ञान कर्मचाऱ्यांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत.

पुढील ३ ते ५ वर्षे परिवर्तनासाठी अत्यंत कळीची

बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्यासाठी झोहो सध्या आपल्या संपूर्ण व्यावसायिक रचनेचे पुनर्गठन करत आहे. हे व्यावसायिक स्थित्यंतर यशस्वी होणार की नाही, हे ठरवण्यासाठी पुढील तीन ते पाच वर्षांचा काळ अत्यंत निर्णायक ठरणार आहे, असे वेम्बू यांनी स्पष्ट केले. कंपनी या कठीण टप्प्यातून यशस्वीरीत्या बाहेर पडावी, यासाठी त्यांनी आपल्या हितचिंतक व फॉलोअर्सना प्रार्थनेचे आवाहनही केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT