Chief Justice Suo Motu on Ahmedabad Plane Crash
नवी दिल्ली : अहमदाबाद विमान अपघात प्रकरणाची सरन्यायाधीश भूषण गवई यांनी स्वतःहून (सु-मोटो) दखल घ्यावी, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी (दि.१३) करण्यात आली. यासाठी दोन डॉक्टरांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांना पत्र लिहून याचिका दाखल केली. याचिकेमध्ये एअर इंडिया विमान अपघातातील पीडितांना भरपाई देण्याचे निर्देश केंद्र सरकारला देण्याची मागणी करण्यात आली आहे.
डॉ. सौरव कुमार आणि डॉ. ध्रुव चौहान यांनी वकील सत्यम सिंह राजपूत यांच्यामार्फत याचिका दाखली केली आहे. न्यायालयाने केंद्र सरकारला अपघातातील पीडितांना (विमानातील लोक तसेच बी. जे. मेडिकल कॉलेजचे निवासी डॉक्टर) ५० लाख रुपयांची अंतरिम भरपाई देण्याचे निर्देश द्यावेत, असे याचिकेत म्हटले.
सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला या अपघाताबाबत उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे निर्देश द्यावेत. या समितीमध्ये सर्वोच्च न्यायालय/उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश, विमान वाहतूक तज्ञ, विमा आणि आर्थिक बाबींचे तज्ञ यांचा समावेश असावा जेणेकरून नुकसानभरपाईची रक्कम योग्यरित्या निश्चित होईल. न्यायालयाने संबंधित अधिकाऱ्यांना अपघाताच्या कारणाची सविस्तर चौकशी करण्याचे आणि असे अपघात पुन्हा घडू नयेत, यासाठी योग्य ती पावले उचलण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी याचिकेत केली आहे.