Ahmedabad plane crash Bhagavad Gita survives
अहमदाबाद : लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान गुरूवारी (दि. १२) दुपारी अहमदाबादमध्ये कोसळले. २६१ जणांचा बळी घेतलेल्या या भीषण अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. या दुर्घटनेनंतर आता बचावकार्य जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र, या विनाशकारी घटनेतून एक अत्यंत आश्चर्यकारक बाब समोर आली आहे, ज्याने सर्वांनाच थक्क केले आहे. जिथे आगीच्या प्रचंड ज्वाळांनी विमानाचे लोखंडी भागही वितळवून टाकले, तिथे पवित्र भगवद्गीता ग्रंथाला साधी झळसुद्धा लागली नाही. (Ahmedabad plane crash)
या भीषण अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्यासह २४१ प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले. संपूर्ण विमान जळून खाक झाले. सर्वत्र केवळ मृतदेह आणि विमानाचे जळलेले तुकडे-तुकडे पसरले होते. या भयंकर आगीतून केवळ एकच प्रवासी सुदैवाने वाचला आहे. बचाव पथकाने दिलेल्या माहितीनुसार, स्फोटानंतर लागलेल्या आगीने विमान आणि आजूबाजूच्या वस्तूंचे प्रचंड नुकसान झाले. सर्व काही जळून राख झाले.
अशा स्थितीत, बचाव पथकाला ढिगाऱ्याखाली एक भगवद्गीता ग्रंथ सापडला आहे. अहमदाबादहून लंडनला प्रवास करणारा एखादा प्रवासी हा पवित्र ग्रंथ आपल्यासोबत घेऊन जात असावा. जिथे धातूच्या सर्व वस्तू जळून राख झाल्या होत्या, तिथे भगवद्गीता मात्र पूर्णपणे सुरक्षित आणि वाचण्यायोग्य स्थितीत आढळून आली. उपस्थित लोक या घटनेकडे एक मोठा चमत्कार म्हणून पाहत आहेत.
सोशल मीडियावर भगवद्गीतेचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक व्यक्ती अपघात स्थळावर जळालेल्या ढिगाऱ्यातून भगवद्गीतेची पाने दाखवताना दिसत आहे. विमानाचे जळालेले आणि तुटलेले भाग, राख आणि मातीच्या ढिगाऱ्यातून भगवद्गीता ग्रंथ सुरक्षित सापडणे चमत्कारिक आणि लोकांच्या श्रद्धा व आस्थेचे प्रतीक बनले आहे. या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर लोक भावना व्यक्त करत असून, अनेकांनी याला 'अविश्वसनीय' आणि 'ईश्वरी संकेत' म्हटले आहे.