आपल्‍या मागण्‍या मान्य झाल्‍या नाही तर कुटुंबासह इस्लाम धर्म स्वीकारणार असल्याचा इशारा जुनागड येथील काँग्रेसच्‍या अनुसूचित जाती-जमाती सेलचे अध्‍यक्ष राजेश सोळंकी यांनी दिला आहे.  Representative image
राष्ट्रीय

'...अन्यथा माझे संपूर्ण कुटुंब इस्लाम धर्म स्वीकारेल' : गुजरात काँग्रेस नेत्‍याचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

माझ्‍या मुलाला झालेल्‍या मारहाण प्रकरणी गुजरातमधील राजकोट जिल्‍ह्यातील गोंडलच्या भाजप आमदार गीता जडेजा यांनी राजीनामा द्यावा. त्‍यांच्‍या पतीला अटक करण्‍यात यावी, अशी मागणी गुजरातमधील जुनागड येथील काँग्रेसच्‍या अनुसूचित जाती-जमाती सेलचे अध्‍यक्ष राजेश सोळंकी यांनी केली आहे. आपल्‍या मागण्‍या मान्य झाल्‍या नाही तर कुटुंबासह इस्लाम धर्म स्वीकारणार असल्याचा इशाराही त्‍यांनी दिला आहे.

यासंदर्भात 'द इंडियन एक्स्प्रेस'ने दिलेल्‍या वृत्तात म्‍हटलं आहे की, राजेश सोळंकी यांचा मुलगा संजय सोळंकी हा काँग्रेसच्‍या विद्यार्थी नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाचा (NSUI) नेता आहे. गीता जडेजा यांचा मुलगा ज्योतिरादित्य सिंह उर्फ ​​गणेश याने किरकोळ कारणातून संजयवर मे महिन्‍यात प्राणघातक हल्‍ला केला होता.

या प्रकरणी माध्‍यमांशी बोलताना राजेश सोळंकी यांनी सांगितले की, गुजरातमधील भाजप सरकारने गीता जडेजा आणि त्यांचे पती जयराज सिंह जडेजा यांच्यावर कारवाई करावी. अन्‍यथा सोळंकी कुटुंबासह सुमारे 150 सदस्य इस्लाम स्वीकारतील.

नेमकं काय घडलं होतं?

संजय सोळंकी यांनी आपल्‍या तक्रारी म्‍हटलं होते की, "ज्योतिरादित्य सिंग आणि त्‍यांच्‍या सहकार्यांनी ड्रायव्हिंगवरून झालेल्या वादानंतर जुनागडमधून आपले अपहरण केले. यानंतर राजकोट जिल्ह्यातील गोंडल येथे नेले, पिस्तुलाने धमकावले, कपडे काढले आणि मोबाईल फोनवर व्हिडिओ रेकॉर्ड करताना माफी मागायला भाग पाडले."

मारहाणातील सूत्रधारासह १० जणांना अटक

यानंतर पोलिसांनी ज्योतिरादित्य सिंग आणि इतर 10 जणांना खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यान्वये अटक केली आहे. सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ज्योतिरादित्य सिंह यांचे वडील जयराज सिंह यांचाही संजयचे अपहरण आणि प्राणघातक हल्ला करण्याच्या कटात सहभाग असल्याचा आरोप संजयचे वडील राजेश सोळंकी यांनी केला आहे.

राज्‍य सरकारला १५ ऑगस्‍टपर्यंत अल्टीमेटम

आमदार गीता जडेजा यांनी राजीनामा द्‍यावा. त्‍यांच्‍या पतीवर अटकेची कारवाई १५ ऑगस्‍टपर्यंत झाली नाही तर आम्ही गांधीनगरमध्ये मोठा मोर्चा काढू. आमच्‍या मागण्‍या मान्‍य झाल्‍या नाही तर इस्लाम धर्म स्वीकारू, असा अल्‍टीमेटमही सोळंकी यांनी गुजरात सरकरला दिला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT