अहमदाबाद विमान अपघात. File Photo
राष्ट्रीय

Ahmedabad Air India crash : पायलटला दोषी ठरवणे 'बेजबाबदार' : सुप्रीम कोर्ट

केंद्र सरकारासह नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला बजावली नोटीस

पुढारी वृत्तसेवा

Ahmedabad Air India crash: अहमदाबादमध्ये 12 जून 2025 रोजी झालेल्‍या एअर इंडियाचे विमान अपघाताची स्वतंत्र आणि न्यायालयाच्या देखरेखीखाली जलद चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज (दि.२२) सर्वोच्‍च न्‍यायालयात सुनावणी झाली. प्राथमिक चौकशी अहवालाच्या आधारावर वैमानिकांना दोषी ठरवणे "बेजबाबदार" आहे, असे न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले आहे.

न्‍यायालयाने घेतली AAIB प्राथमिक अहवालातील काही मुद्द्यांची दखल

12 जून रोजी एअर इंडियाचे एआय 171 विमान अहमदाबादहून उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांतच कोसळले होते. एका स्वतंत्र एजन्सीमार्फत या अपघाताची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवरील (PIL) सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने प्राथमिक चौकशी अहवालातील निवडक माहिती बाहेर पडण्याला ‘दुर्दैवी’ म्हटले. तसेच या प्रकरणी निष्पक्ष, स्वतंत्र आणि जलद चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकेवर न्यायालयाने केंद्र सरकार आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला (DGCA) नोटीस बजावली. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन. कोटिश्वर सिंह यांच्या खंडपीठाने 12 जुलै रोजी जाहीर झालेल्या विमान अपघात चौकशी ब्युरोच्या (AAIB) प्राथमिक अहवालातील काही मुद्द्यांची दखल घेतली.

गोपनीयता माहितीच्या संरक्षणाकडे लक्ष देण्याची गरज

'सेफ्टी मॅटर्स फाउंडेशन' या स्वयंसेवी संस्थेतर्फे बाजू मांडणारे वकील प्रशांत भूषण यांनी असा आरोप केला की, अपघातानंतर स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीमध्ये तीन सदस्य विमान वाहतूक नियामक संस्थेचेच होते. यामध्ये हितांच्या संघर्षाचा मुद्दा असू शकतो. त्यांनी अपघाताचे कारण शोधण्यासाठी विमानातील उड्डाण डेटा रेकॉर्डरमधील माहिती सार्वजनिक करण्याची मागणी केली. या प्रकरणात गोपनीयता आणि वैयक्तिक माहितीच्या संरक्षणाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे न्यायालयाने स्‍पष्‍ट केले. तसेच अपघाताच्या स्वतंत्र, निष्पक्ष आणि जलद चौकशीच्या मर्यादित पैलूवरच नोटीस बजावण्यात येत आहे. अंतिम अहवाल लवकरत लवकर जाहीर करण्याची सूचनाही न्यायालयाने यावेळी केली.

विमान सुरक्षा NGO ने दाखल केली आहे याचिका

कॅप्टन अमित सिंह (FRAeS) यांच्या स्‍वयंसेवी संस्‍थेने ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेत असा आरोप करण्यात आला आहे की, अधिकृत चौकशीमुळे नागरिकांच्या जीवनाच्या, समानतेच्या आणि सत्य माहिती मिळवण्याच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन होत आहे. याचिकेमध्ये असा आरोप करण्यात आला आहे की, अहवालात महत्त्वाची माहिती दडपण्‍यात आली आहे. यात पूर्ण डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर (DFDR) आउटपुट, वेळेच्या नोंदींसह पूर्ण कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) ट्रान्सक्रिप्ट आणि इलेक्ट्रॉनिक एअरक्राफ्ट फॉल्ट रेकॉर्डिंग (EAFR) डेटाबद्दल काहीही सांगितले नाही. या सर्व बाबी अपघाताची पारदर्शक आणि वस्तुनिष्ठ माहिती मिळवण्यासाठी आवश्यक असल्याचे याचिकेत म्हटले आहे.

अहमदाबाद विमान अपघातात २६५ जणांचा मृत्‍यू

12 जून रोजी एअर इंडियाचे बोईंग 787-8 विमान अहमदाबादहून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच एका वैद्यकीय वसतिगृहाच्या आवारात कोसळले. या अपघातात विमानात असलेल्या 241 प्रवासी आणि 12 कर्मचाऱ्यांसह 265 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 169 भारतीय, 52 ब्रिटिश, 7 पोर्तुगीज नागरिक, 1 कॅनेडियन आणि 12 कर्मचारी सदस्यांचा समावेश होता. या अपघातातून वाचलेला एकमेव व्यक्ती ब्रिटिश नागरिक विश्वासकुमार रमेश होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT