Agra crime news
आग्रा: गेल्या ४५ दिवसांपासून पती बेपत्ता असल्याचा कांगावा करणाऱ्या पत्नीचा भयंकर कारनामा अखेर उघडकीस आला आहे. पतीने घर सोडल्याचे नातेवाईक आणि पोलिसांना सांगणाऱ्या या महिलेने पतीची हत्या करून त्याचा मृतदेह चक्क राहत्या घराच्या बाथरूममध्ये फरशीखाली गाडल्याचा धक्कादायक प्रकार आग्र्यामध्ये समोर आला आहे. पोलिसांनी बाथरूमचे नूतनीकरण केलेल्या भागाचे खोदकाम केले असता, या ४४ वर्षीय व्यक्तीचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह बाहेर काढण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी पत्नीला अटक केली आहे.
सुरेंद्र कुमार शर्मा (वय ४४) असे मृत पतीचे नाव आहे. याप्रकरणी त्याची पत्नी रुबी हिला अटक करण्यात आले आहे. सुरेंद्र हे १८ मे पासून बेपत्ता होते. रूबी हिने पती कुठेतरी गेले असून लवकरच परततील, असे नातेवाईक आणि शेजाऱ्यांना सांगितले होते. अखेर २६ मे रोजी या प्रकरणी पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली. मात्र, पोलिसांना सुरुवातीपासूनच या प्रकरणात संशय येत होता. तपासादरम्यान रुबीच्या जबाबात अनेक विसंगती आढळून आल्या.
शुक्रवारी एका जुन्या प्रकरणाच्या पडताळणीसाठी पोलीस पुन्हा त्यांच्या घरी पोहोचले असता, रुबी कमालीची घाबरली आणि तिचे वर्तन संशयास्पद वाटले. त्याच वेळी सुरेंद्र यांच्या भावाने पोलिसांना काही महत्त्वाची माहिती दिली. या संशयावरून पोलिसांनी घराची कसून झडती घेण्याचा निर्णय घेतला.
बाथरूममधील नव्या फरशीने उघड केले गुपित
झडतीदरम्यान पोलिसांची नजर बाथरूममधील अगदी नव्याने बसवलेल्या टाईल्स आणि प्लास्टरवर गेली. तिथे काहीतरी लपवले असल्याचा दाट संशय आल्याने पोलिसांनी तातडीने तेथील फरशा उखडण्याचे आदेश दिले. काही वेळातच फरशीखालची माती हटवताच सुरेंद्र यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला.
असा रचला होता कट...
प्राथमिक तपासानुसार, सुरेंद्र यांची हत्या केल्यानंतर आरोपी पत्नीने पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह बाथरूममध्ये गाडला. मृतदेहावर माती टाकून त्यावर प्लास्टर केले आणि त्यानंतर कोणालाही संशय येऊ नये म्हणून वरून नव्या टाईल्स बसवून घेतल्या. या कटात तिला आणखी कोणी मदत केली होती का, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
पोलिसी खाक्या दाखवताच रुबीने आपल्या पतीची हत्या केल्याची कबुली दिली. हत्येचा कट तिने आधीच रचला होता, त्यासाठी घटनेपूर्वीच तिने बाथरूमच्या नूतनीकरणासाठी गवंडी आणि मजुरांची व्यवस्था करून ठेवली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. सुरेंद्र याचा भाऊ अनिल शर्मा याने दिलेल्या माहितीनुसार, सुरेंद्रला दारूचे व्यसन होते, ज्यामुळे पती-पत्नीत वारंवार वाद होत असत.