Crime News:
आग्रा: मोबाईलमधील जुने फोटो आणि व्हिडिओ हटवण्यास नकार दिल्याने एका रिक्षाचालकाला त्याच्या एक्स लिव्ह-इन पार्टनरने, तिच्या पतिच्या मदतीने जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना आग्र्यात घडली आहे. या भीषण घटनेत गंभीर भाजलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
चांद उर्फ सद्दाम (वय ३५, आग्रा) असे मृताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सद्दाम हा आग्र्यातील शाहगंज परिसरातील रहिवासी होता. तो रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करत असे. २७ फेब्रुवारी रोजी प्रवाशांना सोडून घरी परतत असताना, डौरेठा भागात त्याच्या आधीच्या लिव्ह-इन पार्टनरने आणि तिच्या पतीने त्याला अडवले. त्याला रिक्षामधून बाहेर ओढत एका निर्जनस्थळी नेण्यात आले. तिथे त्याच्यावर पेट्रोल ओतून त्याला पेटवले. सद्दामचा आक्रोश ऐकून स्थानिक नागरिक मदतीसाठी धावले. त्यांनी त्याला तातडीने रूग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
सद्दाम आणि आरोपी महिला शबनम हे गेल्या दोन वर्षांपासून 'लिव्ह-इन रिलेशनशिप'मध्ये राहत होते. शबनमच्या पहिल्या पतीच्या निधनानंतर ते एकत्र राहत होते. मात्र, काही महिन्यांपूर्वी शबनमने तिचा दीर अली अहमद याच्याशी लग्न केले. लग्नानंतर तिने सद्दामकडे त्यांच्या जुन्या फोटोंची आणि व्हिडिओंची मागणी केली होती. सद्दामने ते फोटो डिलीट करण्यास नकार दिल्याने त्यांच्यात वाद झाला. याच रागातून शबनम, तिचा पती अली अहमद आणि त्यांच्या साथीदारांनी हत्या कल्याचा आरोप सद्दामच्या कुटुंबीयांनी केला आहे.
याप्रकरणी संशयित आरोपी शबनम आणि तिचा पती अली अहमद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे, असे लोहामंडी पोलिस अधीक्षक गौरव सिंग यांनी सांगितले.