Agnipath Scheme (file photo)
राष्ट्रीय

Agnipath Scheme | भारतीय सशस्त्र दलात अग्निवीरांची संख्या वाढणार; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये बजावली चांगली कामगिरी

ऑपरेशन सिंदूर दरम्यान अग्निवीरांनी केलेली कामगिरी उत्कृष्ट असल्याचे आढळून आले आहे

दीपक दि. भांदिगरे

Agnipath Scheme

केंद्र सरकारने जेव्हा अग्निपथ योजना सुरू केली तेव्हा त्याला जोरदार विरोध करण्यात आला. ही योजना तरुणांसोबत भेदभाव करणारी असल्याचा आरोप करत विरोधकांनी ही योजना मागे घेण्याची मागणी केली. दरम्यान, आमी, नौदल आणि हवाई दल अग्निपथ योजनेचा आढावा घेत असून सशस्त्र दलांमध्ये अग्निवीरांची संख्या वाढवण्याबाबत चर्चा सुरू आहे.

भारतीय लष्करामध्ये जास्तीत जास्त तरुणांनी सामील होण्यासाठी तसेच त्यांना लष्करात दाखल होण्याची संधी मिळावी या उद्देशाने केंद्र सरकारने अग्निपथ योजना सुरू केली. या योजनेंतर्गत ज्या तरुणांची निवड होते त्यांना अग्निवीर म्हटले जाते. अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीरांची सैन्याच्या तिन्ही दलांमध्ये ४ वर्षांसाठी भरती करण्यात येते. त्यांची ४ वर्षे पूर्ण झाल्यानंतर, जास्तीत जास्त २५ टक्के अग्निवीरांना सैन्यात कायम ठेवण्यात येते.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबविले. या अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करुन ते उद्ध्वस्त करण्यात आले. त्यानंतर आता सशस्त्र दलांमध्ये अग्निवीरांची संख्या वाढवण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे समजते.

अग्निवीरची कामगिरी 'उत्कृष्ट'

इंडियन एक्सप्रेसने सूत्रांचा हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, ऑपरेशन सिंदूर दरम्यान अग्निवीरांनी केलेली कामगिरी उत्कृष्ट असल्याचे आढळून आले आहे. अग्निवीरांची पहिली तुकडी २०२६ च्या अखेरीस तयार होणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, सैन्य दलात अग्निवीरांची संख्या २५ टक्क्यांनी वाढविण्यावर विचार सुरु आहे. इन्फट्री आणि इतर सशस्त्र दलांमध्ये अग्निवीरांची संख्या ७० ते ७५ टक्के, हवाई संरक्षण, सिग्नल, अभियंते आदी ८० टक्के आणि स्पेशल फोर्सेसमध्ये अग्निवीरांची संख्या १०० टक्क्यांपर्यंत वाढविण्यावर चर्चा सुरू असल्याचे समजते. अग्निवीरांचे सरासरी वय अधिक वाढवले जाऊ नये याचीही काळजी घेतली जाणार आहे. अग्निवीर भरतीसाठी वयोमर्यादा १७.५ वर्षे ते २१ वर्षे अशी आहे.

अग्निवीर भरतीसाठी चांगला प्रतिसाद

एअर चीफ मार्शल एपी सिंह यांनी म्हटले होते की अग्निवीर भरतीसाठी चांगला प्रतिसाद मिळात आहे. त्यांची संख्या २५ टक्के वाढवली जाऊ शकते. विशेष म्हणजे 'ऑपरेशन सिंदूर'नंतर, तिन्ही सैन्य दलांमध्ये अग्निवीरांचे महत्त्व वाढले आहे. यामुळे त्यांची संख्यादेखील वाढवली जाऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT