

सोलापूर : राज्यात गेल्या दोन-तीन वर्षांपासून तलाठी पदांची भरती प्रक्रिया रखडली असून, तलाठी अर्थात ग्राम महसूल अधिकार्यांची तब्बल 1700 पदे आहेत. ही पदे लवकरच भरली जाणार असून त्याची प्रक्रियादेखील सुरू करण्यात आली आहे. केवळ वित्त विभागाची मान्यता मिळताच ती भरली जाणार आहे. परंतु आदेश कधी निघणार याकडे लक्ष लागून आहे.
राज्यात 2023 साली तलाठी पदांसाठी मेगा भरती करण्यात आली. 4793 पदांची जाहिरात काढण्यात आली होती. त्यातील 4212 उमेदवारांनी राज्यभरात नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यापैकी 3850 उमेदवारांनी पदभारही स्वीकारला आहे. त्यामुळे जाहिरातीपैकी 942 ग्राम महसूल अधिकार्यांच्या जागा रिक्तच राहिल्या. तर त्याव्यतिरिक्तही 757पदे आता रिक्त आहेत. अशी सर्व मिळून1700 पदे रिक्त आहेत. लवकरच राज्य शासनाच्या वतीने आता प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या लेखी उत्तरात आ.दाते यांना कळविले आहेत.
परिणामी आता राज्यात 1700 ग्राम महसूल अधिकार्यांची पदे भरली जाणार असल्याने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्या उमेदवारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 2023 सालच्या ग्राम महसूल अधिकार्यांच्या पदभरतीच्या परीक्षा आयोजनातील गैरप्रकार आणि नियुक्ती वेळीही पैसा मुळे भरती प्रक्रिया वादग्रस्त ठरली होती. तलाठीची भरती तीन वर्षांपासून रखडल्याने राज्यातील हजारो गावे ही अतिरिक्त तलाठी पदावरच सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांची कामे मोठ्या प्रमाणात रखडली आहेत. आता तरी तलाठी भरती करण्यात यावी अशी मागणी होत आहे.