नवी दिल्ली : अदानी समूहाने मंगळवारी 100 अब्ज डॉलर्सची भव्य गुंतवणूक जाहीर करत 2035 पर्यंत नवीकरणीय ऊर्जेवर चालणारी, हायपरस्केल आणि एआय-रेडी डेटा सेंटर उभारण्याचा संकल्प जाहीर केला. जगातील सर्वात मोठ्या एकात्मिक ऊर्जाकम्प्युट क्षमतेच्या प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प ठरणार असल्याचा दावा समूहाने केला आहे.
समूहाच्या प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राईझेसने दिलेल्या निवेदनानुसार, या उपक्रमामुळे सर्व्हर उत्पादन, क्लाऊड प्लॅटफॉर्म आणि पूरक उद्योगांमध्ये अतिरिक्त 150 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आकर्षित होण्याची शक्यता आहे. यामुळे भारतात सुमारे 250 अब्ज डॉलरचा एआय पायाभूत सुविधा इको-सिस्टीम तयार होईल.
समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी म्हटले की, ‘जग एका अशा बुद्धिमत्ता क्रांतीत प्रवेश करत आहे, जी मागील कोणत्याही औद्योगिक क्रांतीपेक्षा अधिक व्यापक आहे. ऊर्जा आणि कम्प्युट यांचा समतोल साधणारी राष्ट्रे पुढील दशक घडवतील.’ भारत या शर्यतीत आघाडी घेण्यास सक्षम असल्याचा त्यांनी विश्वास व्यक्त केला.
सध्या अदानीकडे 2 गिगावॅट राष्ट्रीय डेटा सेंटर प्लॅटफॉर्म आहे. तो 5 गिगावॅटपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सोबत, विशाखापट्टणम येथे गिगावॅटस्तरीय एआय डेटा सेंटर कॅम्पस उभारण्याचा करार झाला असून, सोबत हैदराबाद आणि पुणे येथे अशाच सुविधा उभारल्या जाणार आहेत. याशिवाय, सोबत उच्च-कार्यक्षमता एआय वर्कलोडसाठी दुसरे एआय डेटा सेंटर विकसित करण्यावरही सहकार्य सुरू आहे.