काँग्रेस Pudhari File Photo
राष्ट्रीय

राहुल गांधींना धमकावल्याबद्दल भाजप नेत्यावर कारवाई करावी : काँग्रेसची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली -

राहुल गांधींना इंदिरा गांधी यांच्या प्रमाणेच मारण्याची धमकी दिल्याबद्दल भाजप नेते तरविंदर सिंग मारवाह यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. तसेच मारवाह भाजप नेतृत्वाकडून असे वक्तव्य करत आहेत का, असा सवालही काँग्रेसने केला. पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजितसिंह चन्नी आणि पंजाब विधानसभेतील विरोधी पक्षनेते प्रतापसिंह बाजवा यांनी शुक्रवारी (दि.13) दिल्लीस्थित पक्ष मुख्यालयात पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी बोलताना चन्नी म्हणाले की, राहुल गांधींनी अमेरिकेत जे बोलले त्याला पंजाब राज्यातील जनतेचे आणि शिख लोकांचे पुर्ण समर्थन आहे.

चरणजितसिंह चन्नी म्हणाले की, राहुल गांधींनी देशातील अल्पसंख्याक, दलित आणि मागासवर्गीय लोकांमध्ये त्यांच्या सुरक्षिततेबद्दल आणि जगण्याबद्दलची भीती आहे त्यावर आवाज उठवला आणि त्यात काहीही चुकीचे नाही. तर प्रतापसिंह बाजवा यांनी गेल्या दहा वर्षांत देशात घडलेल्या घटनांच्या उल्लेख केला आणि पंजाबला निवडक गोष्टींवर लक्ष्य केले जात असल्याचे ते म्हणाले. तसेच भाजप सरकार पंजाबचे हजारो कोटींचे अनुदान रोखत असल्याचा आरोप त्यांनी केला.

एका प्रश्नाला उत्तर देताना चन्नी म्हणाले की, १९८४ मध्ये जे काही घडले त्याबद्दल काँग्रेस पक्षाने अनेकदा माफी मागितली आहे मात्र त्याच वेळी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी दरबार साहिबमध्ये लष्करी कारवाईसाठी इंदिरा सरकारवर दबाव निर्माण केला होता हे मान्य केल्याचा संदर्भही दिला. आणि त्यासाठी भाजप माफी मागणार का, असा सवालही विचारला.

काय आहे प्रकरण ?

काँग्रेस नेते राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर असताना त्यांनी समोर बसलेल्या एका शीख व्यक्तीला प्रश्न विचारत पगडी संदर्भात एक वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याचे पडसाद भारतात उमटले होते. भाजपच्या शीख आघाडीने याविरुद्ध निदर्शने केली होती आणि यामध्ये भाजप नेते तरविंदर सिंह मारवा यांनी इंदिरा गांधींप्रमाणेच तुमचाही निकाल लावू, अशा प्रकारची धमकी राहुल गांधींना दिली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT