Abhijit Deepke statement : 'कॉकरोच जनता पार्टी'चे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांनी आसाममध्ये आशुतोष रंका यांना ताब्यात घेतल्याप्रकरणी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी हिमंता यांना सर्वांनाच अटक करण्याचे आव्हान दिले असून, आशुतोष यांची सुटका न झाल्यास CJP चे सर्व सदस्य आसामला जातील, असेही स्पष्ट केले आहे.
आशुतोष रंका आणि त्यांच्या टीमला गुवाहाटीमध्ये ताब्यात घेण्यात आले आहे. रंका म्हणाले, "हिमंता बिस्वा सरमा यांना भीती वाटते की, जर आम्ही आसाममधील शाळांचे वास्तव उघड केले, तर देशाला त्यांची खरी स्थिती समजेल. त्यांना याचीही भीती वाटते की काझीरंगामधील लोकांचे हक्क हिरावून घेतले जात आहेत आणि त्यांची जमीन, जंगले व पाणी कॉर्पोरेट कंपन्यांच्या हवाली केले जात आहे."
सोशल मीडिया फ्लॅटफॉर्म एक्सवरील पोस्टमध्ये अभिजीत दीपके यांनी म्हटले आहे की, "आशु यांना आसाम पोलिसांनी एका खाजगी निवासस्थानातून ताब्यात घेतले. त्यांना अद्याप त्यांच्यावरील आरोप किंवा ताब्यात घेण्याचे कारण सांगण्यात आलेले नाही. जर आशु यांची सुटका झाली नाही, तर मी CJP च्या इतर सदस्यांसह आसामला जाईन. हिमंता आम्हाला सर्वांना अटक करू शकतात." याआधी दीपके यांनी सांगितले होते की, स्वयंसेवकांच्या एका छोट्या बैठकीपूर्वीच पोलिसांनी रंका आणि त्यांच्या अनेक समर्थकांना ताब्यात घेऊन अज्ञात स्थळी नेले होते.
एक दिवस आधीच गुवाहाटीला पोहोचलेल्या रंका यांनी दिवसा काही CJP समर्थकांना भेटण्याचे नियोजन केले होते. दीपके यांनी दावा केला की, संघटनेच्या नेत्यांना बैठक घेण्यापासून रोखण्यात आले. दरम्यान, हिमंता यांच्यावर टीका करताना रंका यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, "हिमंता मामा" यांना भीती वाटते की 'ज्ञानेश' प्रकरणाच्या निमित्ताने आसाम निवडणुकीतील फेरफार (rigging) उघड होऊ शकतात. विधानसभा मतदारसंघांच्या सीमा कशा नव्याने आखल्या गेल्या, ज्यामुळे एकाच गावातील रहिवासी तीन वेगवेगळ्या मतदारसंघांत विभागले गेले, याचा विचार करा. तसेच, एसआयआर (SIR - विशेष तपास अहवाल) प्रक्रियेच्या नावाखाली आसाममधील नागरिकांना मतदार यादीतून कसे वगळण्यात आले, याचाही विचार करा, असेही 'X' वर शेअर केलेल्या व्हिडिओद्वारे रंका यांनी म्हटले आहे.
रंका यांनी 'X' खात्यावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये एका चालत्या वाहनात पोलीस कर्मचाऱ्यांसोबत बसलेले दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये ते असा आरोप करताना ऐकू येतात की, आसाममधील शाळांचे वास्तव उघड करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 'सीजेपी' (CJP)च्या स्वयंसेवकांना आणि त्यांना मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी आसामच्या जनतेच्या भीतीपोटी ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून नेले जात असताना रंका यांनी माध्यमांना सांगितले की, , ही कारवाई मुख्यमंत्री सरमा यांची 'सत्य उघड होण्याबाबतची भीती' दर्शवते. त्यांना भीती वाटते की जर आम्ही येथील शाळांचे वास्तव जगासमोर मांडले, तर देशाला सत्य समजेल. त्यांना भीती वाटते की, कॉर्पोरेट कंपन्यांच्या फायद्यासाठी काझीरंगामध्ये लोकांचे हक्क कसे हिरावून घेतले जात आहेत, हे लोकांना कळेल. पण आम्ही त्यांना घाबरत नाही. आम्हाला माहित आहे की, त्यांनी मतदारसंघांच्या सीमांची पुनर्रचना करूनच विधानसभा निवडणुका जिंकल्या होत्या."