Abhijeet Dipke on PM Modi National Handloom Day video:
नवी दिल्ली : राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर विशेष मोहिम सुरू करत नागरिकांना हातमाग उत्पादने खरेदी करण्याचे आणि त्याचे व्हिडिओ शेअर करण्याचे आवाहन केले आहे. या पोस्टवर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी 'Prime Influencer' अशी टिप्पणी करत टोला लगावला आहे. त्यानंतर दीपकेंनी दुसऱ्या व्हिडिओद्वारे स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात युवकांच्या प्रश्नांवर भाष्य करण्याचे आवाहनही पंतप्रधान मोदी यांना केले आहे.
आज (दि. ७) साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी इन्स्टाग्राम आणि एक्सवर व्हिडिओ शेअर केला. यामध्ये नागरिकांनी आपल्या आवडत्या हातमाग उत्पादनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करावेत आणि #NationalHandloomDay हा हॅशटॅग वापरावा, असे आवाहन त्यांनी केले.
व्हिडिओमध्ये विविध रंगीबेरंगी हातमाग वस्त्रे दाखवत मोदी म्हणाले की, ७ ऑगस्ट १९०५ हा दिवस विसरून चालणार नाही. याच दिवशी स्वदेशी आंदोलनाची सुरुवात झाली होती. फ्रेंडशिप डे ज्या उत्साहात साजरा केला जातो, त्याच उत्साहाने राष्ट्रीय हातमाग दिनही साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले.
हातमाग दिन साजरा करणे म्हणजे छोट्या घरातून हातमागावर वस्त्रे तयार करणाऱ्या गरीब विणकर कुटुंबांना पाठबळ देणे होय, असे मोदी म्हणाले. हातमाग उत्पादनांमध्ये असंख्य नवीन डिझाइन्स आणि वैविध्य उपलब्ध असून आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी समाजातील सर्वात गरीब कुटुंबही आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. मोदी यांच्या इन्स्टाग्राम रीलवर अनेक प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. त्यामध्ये अभिजित दिपके यांनी 'Prime Influencer' अशी एक ओळीची टिप्पणी केली.
यानंतर दिपके यांनी आणखी एक व्हिडिओ शेअर करत पंतप्रधान मोदींना स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून होणाऱ्या भाषणात देशातील युवकांच्या समस्या आणि त्यांच्यासाठी सरकार कोणती पावले उचलत आहे, याबाबत स्पष्टपणे बोलण्याची विनंती केली. "यंदाच्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांनी थेट युवकांशी संवाद साधावा आणि त्यांच्या भविष्यासाठी सरकारची भूमिका स्पष्ट करावी," असे दिपके यांनी व्हिडिओत म्हटले आहे.