Abhijeet Dipke Ink Attack: दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांच्यावर एका महिलेने शाईफेक केल्याची घटना घडली. या प्रकारानंतर आंदोलनस्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. उपस्थित आंदोलकांनी संबंधित महिलेला तात्काळ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. सध्या दिल्ली पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
शाईफेकीच्या घटनेनंतर अभिजीत दीपके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर प्रतिक्रिया देताना, "निळा हा माझा आवडता रंग आहे," असे लिहिले. त्यांच्या या पोस्टची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.
या घटनेपूर्वी अभिजीत दीपके यांनी आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना आमरण उपोषण सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यांनी सांगितले की, "सोनम वांगचुक यांना ज्या पद्धतीने ताब्यात घेण्यात आले, ते अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांच्या अनुपस्थितीत आंदोलन कमकुवत होईल, असे प्रशासनाला वाटत असेल; मात्र आता त्यांच्या जागी मी उपोषणाला बसणार आहे."
दीपके यांनी पुढे आरोप केला की, दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांच्या आरोग्याचा दाखला देत त्यांना ताब्यात घेतले. मात्र, दिल्ली उच्च न्यायालयाने केवळ प्रकृती गंभीर असल्यासच रुग्णालयात दाखल करण्याबाबत निर्देश दिले होते, असे त्यांनी सांगितले.
त्यांच्या मते, सोनम वांगचुक यांनी स्वतःची प्रकृती स्थिर असल्याचे स्पष्ट केले होते आणि उपलब्ध वैद्यकीय अहवालातही त्यांची प्रकृती समाधानकारक असल्याचे नमूद करण्यात आले होते.
दरम्यान, शाईफेक करणाऱ्या महिलेला ताब्यात घेण्यात आले असून तिची चौकशी सुरू आहे. या घटनेबाबत अधिकृत तपास सुरू असून, पुढील माहिती पोलिसांच्या तपासानंतरच मिळणार आहे.