Abhijeet Dipke File Photo
राष्ट्रीय

Abhijeet Dipke: ‘ही तर फक्त सुरुवात...’; आंदोलन मागे घेतल्यानंतर अभिजीत दीपके यांचा पहिलाच व्हिडिओ, पाहा काय म्हणाले?

गेल्या ३७ दिवसांपासून सुरू असलेले 'कॉकरोच जनता पक्षा'चे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. त्यानंतर अभिजीत दीपके यांनी एक व्हीडिओ जारी केला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Abhijeet Dipke Cockroach Janata Party

नवी दिल्ली: नीट परीक्षेतील कथित गैरप्रकारांविरोधात दिल्लीतील जंतरमंतरवर गेल्या ३७ दिवसांपासून सुरू असलेले 'कॉकरोच जनता पक्षा'चे आंदोलन अखेर यशस्वीरीत्या मागे घेण्यात आले आहे. केंद्र सरकारने सर्व प्रमुख मागण्या मान्य केल्यानंतर पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी एक व्हीडिओ जारी करत देशभरातील समर्थकांचे मनःपूर्वक आभार मानले.

"गेले ३७ दिवस अत्यंत संघर्षाचे आणि कठीण होते. आता कुठे मला शांत झोप लागेल," अशा भावना व्यक्त करत, "ही तर फक्त सुरुवात असून अजून लांबचा पल्ला गाठायचा आहे," असा निर्धार त्यांनी या वेळी व्यक्त केला.

अनेक दिवसांच्या आंदोलनामुळे दीपके यांची प्रकृती खालावली असून त्यांना टायफॉईड आणि १०१ अंश ताप असल्याचे निष्पन्न झाले आहे. या पार्श्वभूमीवर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना घरी परतावे लागले. जंतरमंतरवर आपली वाट पाहणाऱ्या समर्थकांची प्रकृती अस्वास्थ्यामुळे प्रत्यक्ष भेट घेता आली नाही, याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त करत क्षमा मागितली.

देशभरातून मिळालेल्या अभूतपूर्व पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना दीपके म्हणाले, "जेव्हा सगळे आमच्यावर शंका घेत होते, तेव्हा तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवलात आणि प्रेम दिले. तुमच्या भक्कम पाठिंब्याशिवाय हे यश मिळवणे अशक्य होते. ३७ दिवस जंतरमंतरवर उन्हा-पावसाची तमा न बाळगता ठामपणे उभे राहिलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला आणि समर्थकाला माझा मनःपूर्वक सलाम!"

टीकाकारांचेही मानले आभार

आंदोलनादरम्यान झालेल्या टीकेला सकारात्मकतेने घेत दीपके यांनी टीकाकारांचेही आभार मानले. "ज्यांनी आमच्या गांभीर्यावर प्रश्न उपस्थित केले किंवा आम्हाला आंदोलनाची पद्धत कळत नाही अशी टीका केली, त्यांचेही मी आभार मानतो. त्यांनी घेतलेल्या क्षेपामुळेच आम्हाला स्वतःमध्ये सुधारणा करता आली," असे दीपके यांनी म्हटले आहे.

सरकारकडून सर्व मागण्या मान्य

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिल्यानंतर कॉकरोच जनता पक्षाने शनिवारी आपले आंदोलन मागे घेण्याची अधिकृत घोषणा केली. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा, आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या पीडित कुटुंबांना आर्थिक भरपाई आणि आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे मागे घेणे, या पक्षाच्या तिन्ही प्रमुख मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT