नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा-
हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने बुधवारी चौथी यादी जाहीर केली. ‘आप’ने काँग्रेसच्या उमेदवार विनेश फोगाट यांच्या विरोधात आपला उमेदवार रिंगणात उतरवला आहे. जुलाना विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षातर्फे माजी कुस्तीपटू कविता दलाल यांना उमेदवारी देण्यात आली.
आम आदमी पक्षाच्या चौथ्या यादीमध्ये २१ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांच्याविरोधात लाडवा मतदारसंघातून जोगा सिंह यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. आम आदमी पक्षाने आतापर्यंत ६२ उमेदवारांची घोषणा केली आहे.
हरियाणा विधानसभा निवडणुकीत ‘आप’सोबत आघाडी करण्याची इच्छा काँग्रेस नेत्यांना आणखीही आहे. काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी परदेश दौऱ्यावरुन परतल्यानंतर या आघाडीबाबत अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेंदर सिंह हुड्डा यांना आम आदमी पक्षासोबत आघाडी करायची नाही. तर इतर काही काँग्रेस नेत्यांना या आघाडीत रस आहे. त्यामुळे अद्यापही आघाडीबाबत काँग्रेसने अंतिम निर्णय घेतला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने बुधवारी ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल, मनीष सिसोदिया, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नावांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे.