नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दिल्लीमध्ये यंदाही दिवाळीच्या तोंडावर फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीने १ जानेवारी २०२५ पर्यंत फटाक्यांचे उत्पादन, साठवणूक, विक्री, वितरण यावर बंदी घातली आहे. सर्व प्रकारचे फटाके फोडण्यावर संपूर्ण बंदी लादणारा आदेश जारी केला आहे. दिल्ली सरकारमधील पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी हा आदेश जारी केला आहे. आदेशात, दिल्ली सरकारने वायु प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा १९८१ च्या कलम ३१(ए) अंतर्गत फटाक्यांच्या वापरावर बंदी घातली आहे.
पर्यावरण आणि वनमंत्री गोपाल राय म्हणाले की, हिवाळ्यात वाढते प्रदूषण लक्षात घेता फटाक्यांची निर्मिती, साठवणूक, विक्री आणि वापरावरील बंदी आजपासून १ जानेवारी २०२५ पर्यंत लागू राहील. या बंदीबाबत विभागीय आदेशही जारी करण्यात आले आहेत. यासोबतच गोपाल राय यांनी दिल्लीतील जनतेला पर्यावरणाच्या स्वच्छतेबाबत सतर्क राहून प्रदूषण रोखण्यासाठी सरकारला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. दिल्ली सरकार प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी खूप गंभीर आहे. प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार २१ मुद्द्यांवर आधारित हिवाळी कृती योजना लागू करण्याचीही तयारी करत आहे. तसेच दिल्लीतील प्रदूषण थांबवण्यासाठी लोकांनी आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे, असे ते म्हणाले.
दरम्यान, दिल्लीत हवेची गुणवत्ता खालावली आहे. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. सिस्टम ऑफ एयर क्वालिटी एंड वेदर फोरकास्टिंग एंड रिसर्च या संस्थेनुसार रविवारी दिल्लीतील काही परिसरात हवा गुणवत्ता निर्देशांक ३५८ वर पोहोचला आहे. बहुतांश परिसरात वायु गुणवत्ता निर्देशांक २०० च्या पुढे आहे. ३०० च्या पुढे गेल्यानंतर हवा गुणवत्ता निर्देशांक अत्यंत खराब परिस्थितीत आहे, असे मानले जाते.