AAP E20 Protest: E20 पेट्रोलच्या मुद्द्यावर आम आदमी पक्ष (AAP) आता आक्रमक भूमिका घेत असल्याचे दिसत आहे. पक्षाने या विषयावर देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली असून, सरकारने E20 धोरणाचा पुनर्विचार केला नाही तर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा दिला आहे.
याच पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यात पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे निवेदनासह मोर्चा काढण्याची तयारी सुरू असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे.
आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट करत नागरिकांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.
त्यांनी म्हटले की, देशातील युवकांनी एकत्र येऊन आवाज उठवल्यानंतर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. त्याचप्रमाणे E20 पेट्रोलच्या मुद्द्यावरही नागरिकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
अरविंद केजरीवाल यांनी या शनिवारी 'नॅशनल टाउनहॉल अगेन्स्ट E20' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची घोषणा केली आहे.
या कार्यक्रमात नागरिकांना E20 पेट्रोलबाबत आपली मते मांडण्याची संधी दिली जाणार असून, प्रत्यक्ष उपस्थित राहण्याबरोबरच ऑनलाइन सहभागी होण्याचाही पर्याय उपलब्ध असेल.
व्हिडिओ मेसेजमध्ये केजरीवाल यांनी दावा केला की, E20 पेट्रोलमुळे अनेक वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही वाहनांमध्ये तांत्रिक बिघाड होत असल्याच्या तक्रारीही त्यांनी नमूद केल्या. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना E20 पेट्रोलच्या मुद्द्यावर तोडगा काढण्याचे आवाहन केले आणि नागरिकांच्या चिंता लक्षात घेण्याची विनंती केली.
केजरीवाल यांच्या मते, E20 पेट्रोलबाबत नाराजी व्यक्त करणाऱ्या सर्व नागरिकांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.
दिल्ली आणि परिसरातील नागरिकांनी शनिवारी सकाळी 11.30 वाजता संविधान क्लबमध्ये आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमात नागरिकांना आपली मते आणि अनुभव मांडण्याची संधी दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आम आदमी पक्षाने आंदोलनाची घोषणा केली असली, तरी E20 धोरणाबाबत केंद्र सरकारकडून या नव्या आंदोलनावर अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. पुढील काळात या विषयावर सरकार कोणती भूमिका घेते आणि आंदोलनाला किती प्रतिसाद मिळतो, याकडे राजकीय आणि वाहनधारकांचे लक्ष लागले आहे.