प्रातिनिधिक छायाचित्र.  File Photo.
राष्ट्रीय

Aadhaar Update Process |तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाही? जाणून घ्या ७५ रुपयांत अपडेटची सर्वात सोपी पद्धत

Aadhaar Update Process | 'UIDAI'ने नुकतेच केले आहे नवीन आणि सुधारित मोबाईल ॲप लाँच

पुढारी वृत्तसेवा

आधार कार्डवर मोबाईल नंबर अपडेट करण्याची पद्धत पूर्वी सारखी असली तरी तरी आता हा पर्याय ॲपमधील 'सेवा' (Services) विभागात देण्यात आला आहे.

Aadhaar Update Process

नवी दिल्‍ली : भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण अर्थात 'UIDAI'ने नुकतेच आधारचे एक नवीन आणि सुधारित मोबाईल ॲप लाँच केले असून, यामध्ये वापरकर्त्यांसाठी अनेक उपयुक्त सुविधा देण्यात आल्या आहेत. या नवीन आवृत्तीचा इंटरफेस पूर्वीपेक्षा खूपच सोपा करण्यात आला असला, तरी ॲपच्या संपूर्ण मांडणीत (लेआउट) बदल केला आहे. त्‍यामुळें काही जुन्या सुविधा आता नव्या ठिकाणी दिसत आहेत. यामुळे अनेक नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, आपल्या आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर बदलण्याची किंवा अपडेट करण्याची पद्धतही बदलली आहे का, असा प्रश्न त्यांना पडत आहे. या नव्या बदलांनुसार मोबाईल नंबर अपडेट करण्याची नेमकी प्रक्रिया काय आहे, ते जाणून घेऊया.

सेवा विभागातील नवीन बदल

आधार कार्डवर मोबाईल नंबर अपडेट करण्याची पद्धत तशीच असली, तरी आता हा पर्याय ॲपमधील 'सेवा' (Services) विभागात देण्यात आला आहे. या नवीन सुविधेमुळे नागरिकांना घरबसल्या मोबाईल नंबर अपडेट करण्याची विनंती पाठवता येते, त्यामुळे आधार केंद्रावर जाण्याची कसरत आता वाचणार आहे. यासोबतच, नवीन अपडेटमध्ये युआरडीएआयने (UIDAI) अनेक उपयुक्त फीचर्स जोडली आहेत. आता वापरकर्ते कोणत्याही आधार नंबरची खात्री करू शकतात आणि आपला बायोमेट्रिक डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी तो लॉक किंवा अनलॉकही करू शकतात. या सर्व सुविधा आता थेट मोबाईल अॅपवर उपलब्ध झाल्या आहेत.

मोबाईल नंबर अपडेट करण्याची सोपी पद्धत....

  1. तुमचा नंबर अपडेट करण्यासाठी सर्वात आधी मोबाईलमध्ये 'आधार' ॲप डाऊनलोड करून ते उघडा.

  2. त्यानंतर होम पेजवरील 'सेवा' (Services) या टॅबवर जाऊन 'मोबाईल नंबर अपडेट' या पर्यायावर क्लिक करा.

  3. पुढे 'सुरू ठेवा' (Continue) वर टॅप करून तुम्हाला जो नवीन नंबर लिंक करायचा आहे, तो तिथे भरा.

  4. तुमच्या त्या नंबरवर एक ओटीपी (OTP) येईल, तो टाकून पडताळणी पूर्ण करा. त्यानंतर स्क्रीनवर दिसणाऱ्या सूचनांनुसार प्रक्रिया पूर्ण करा.

शुल्क आणि कालावधी

या सुविधेसाठी वापरकर्त्यांना ७५ रुपये शुल्क भरावे लागतील. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुमची विनंती 'UIDAI' कडे पाठवली जाईल. साधारणपणे १० ते १५ दिवसांत तुमचा मोबाईल नंबर अपडेट होतो. विशेष म्हणजे, तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती (Status) देखील या अॅपद्वारे वेळोवेळी तपासू शकता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT