पुढारी ऑनलाईन डेस्क : तेलंगणात एका धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका महिलेने ८ कोटींच्या संपत्तीसाठी प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली आणि त्याचा मृतदेह ८०० किमी दूर नेऊन जाळला. ३ आठवड्यांपूर्वी कर्नाटकातील कोडगू जिल्ह्यातील कॉफीच्या मळ्यात एका व्यक्तीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला होता. सदर व्यक्तीची तेलंगणातील उप्पल येथील त्याची पत्नी आणि तिच्या प्रियकराने हत्या केल्याचा आरोप आहे.
पतीची नावे असलेली ८ कोटी रुपयांची मालमत्ता तिच्या नावावर हस्तांतरित करण्यास नकार दिल्याने पत्नीने १ ऑक्टोबर रोजी उप्पल येथे पतीची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मृत पतीचे नाव रमेश (वय ५५) असे आहे.
या खून प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली आहे. यात रमेशची पत्नी निहारिका, तिचा प्रियकर निखिल आणि दुसरा संशयित आरोपी अंकुर याचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निहारिकाने पतीचा मृतदेह घेऊन तेलंगणातून कर्नाटक असा किमान ८०० किमी प्रवास केला.
या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एका लाल कारने त्यांचे लक्ष वेधून घेतले. ज्यामुळे या खून प्रकरणाचा उलगडा झाला. न्यूज१८ च्या वृत्तानुसार, सदर कार रमेशच्या नावाने नोंद आहे. त्याच्या पत्नीने ती हरवल्याची तक्रार नोंदवली होती. कर्नाटक पोलिसांनी तेलंगणा पोलिसांना याबाबत कळवले आहे.
तेलंगणा पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणी निहारिकाला संशयित म्हणून चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. तिच्या चौकशीदरम्याने तिने पती रमेशची हत्या केल्याची कबुली दिली. या प्रकरणी तिने तिला मदत करणाऱ्या इतर आरोपींची नावेही सांगितली.
निहारिकाचे लवकर लग्न झाले होते. ती एका मुलाची आई देखील आहे. तिचा नंतर घटस्फोट झाला. ती व्यवसायाने इंजिनियर आहे. तिची हरियाणातील एका आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. तिथे तिची भेट अंकुर ह्या अन्य संशयित आरोपीशी झाली.
तिने तुरुंगातून सुटल्यानंतर रमेशशी दुसरे लग्न केले. त्याचवेळी ती निखिलसोबतही रिलेशनशिपमध्ये होती. निखिल आणि अंकुरच्या मदतीने तिने पतीची संपत्ती मिळवण्यासाठी हत्येचा कट रचला आणि रमेश संपवल्याचे उघड झाले आहे.