शवविच्छेदन प्रक्रिया का केली जाते आणि कशी चालते, याबद्दल अनेकांना माहिती नसते. शवविच्छेदन प्रक्रिया, ज्याला पोस्टमार्टम किंवा ऑटोप्सी, असेही म्हटले जाते. मृत्यूच्या कारणाचे आणि वेळेचे स्पष्टपणे विश्लेषण करण्यासाठी वापरली जाते.
पहिला टप्पा : बाह्य तपासणी शरीराच्या बाह्य निरीक्षणाद्वारे जखमा, फुगवटा, रंग बदलणे किंवा इतर दृश्य चिन्हे तपासली जातात आणि संबंधित व्यक्तीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला असावा, याचा प्राथमिक अंदाज लावण्याचा प्रयत्न केला जातो.
दुसरा टप्पा : आंतर तपासणी शरीराच्या आतील अवयवांची स्थिती, आकार व रंग तपासून पाहिली जाते. विशेषतः हृदय, फुफ्फुसे, यकृत इत्यादींची बारकाईने तपासणी केली जाते. अशा तपासणीतून संबंधिताचा मृत्यू हृदयविकार, श्वसनविकार किंवा विषबाधेमुळे की अन्य कोणत्या कारणांमुळे झाला, याचे अचूक निदान करणे सोयीचे जाते.
तिसरा टप्पा : अवयवांचे नमुने तपासणे संबंधित व्यक्तीच्या विविध अवयवांतून पेशींचे नमुने घेतले जातात. हे नमुने मायक्रोस्कोप किंवा रासायनिक विश्लेषणासाठी पाठवले जातात. या विश्लेषणातून संबंधित व्यक्तीच्या मृत्यूच्या कारणांवर अधिक सखोल प्रकाश पडतो.
चौथा टप्पा : लॅब टेस्ट मयत व्यक्तीचे रक्त, मूत्र किंवा इतर द्रवांचे विश्लेषण करून विषारी पदार्थ, औषधे किंवा शरीरातील इतर अपायकारक घटकांची माहिती मिळते. ज्यामुळे मृत्यूचे निदान करणे सोपे होते.
पाचवा टप्पा : विशिष्ट तपासण्या विशेष परिस्थितीत उदा. विषबाधा, जीवाणूजन्य संसर्ग किंवा हृदयविकाराचे निदान करण्यासाठी अतिरिक्त तपासण्या केल्या जातात. ज्यातून त्याबाबतची माहिती मिळते.
सहावा टप्पा : मृत्यूची वेळ ठरवणे व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीराचे स्नायू कडक होण्याची प्रक्रिया सुरू होते, त्याला वैद्यकीय भाषेत रिगोर मॉर्टिस असे म्हटले जाते. सामान्यतः २-४ तासांमध्ये ही प्रक्रिया सुरू होते, १२ तासांमध्ये उच्च शिखरावर पोहोचते आणि नंतर २४-४८ तासांमध्ये कमी होते.
त्याचप्रमाणे व्यक्तीच्या मृत्यूनंतर शरीराचे तापमान हळूहळू कमी होते. संबंधित व्यक्तीच्या शरीराचे तापमान कमी होण्याचा दर मृत्यूच्या वेळेचे निदान करण्यास मदत करतो. मृत्यूनंतर २० मिनिटे ते ३ तासांमधील काळात शरीरातील रक्तप्रवाह थांबल्यामुळे त्वचेत लाल किंवा जांभळे डाग पडतात. या डागांची स्थिती मृत्यूची वेळ ठरविण्यास मदत करते.
अवयवांचे विघटन : व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीरातील- वेगवेगळ्या अवयवांचे विघटन होण्यास सुरुवात होते. त्यानुसार शरीराच्या अवयवांचे विघटन होण्याचा दरही मृत्यूची वेळ निश्चित करण्यासाठी लक्षात घेतले जाते. या प्रक्रियेनंतर मृत्यूचे कारण, वेळ निश्चित केली जाते.