पुढारी ऑनलाईन न्यूज: ज्येष्ठ अभिनेत्री आणि भाजपच्या खासदार हेमामालिनी यांचा मतदारसंघ असलेल्या मथुरा (उत्तरप्रदेश) येथून एक विचित्र प्रकार समोर आला आहे. मथुरेत केवळ अडीच बिघा जमिन असलेल्या एका शेतकऱ्याला प्राप्तीकर विभागाने चक्क 30 कोटी रूपयांची नोटीस पाठवल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या शेतकऱ्याला धक्का बसला आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सौरभ कुमार असे या शेतकऱ्याचे नाव आहे. विशेष म्हणजे, या नोटीसीमुळे येथील एक स्कॅम उघडकीस आला आहे. सौरभ कुमार यांच्या नावावर केवळ अडीच बिघा (साधारण सव्वा एकर) शेतजमिन आहे.
तथापि, 26 मार्च रोजी त्यांना तब्बल 16 कोटींची नोटीस प्राप्तीकर खात्याने पाठवली आहे. सौरभ कुमार यांच्या पॅन कार्डचा वापर करून काही अज्ञातांनी दोन बनावट कंपन्यांद्वारे कोट्यवधी रुपयांचा व्यवहार केला. त्यामुळे ही नोटीस पाठवली गेल्याचे स्पष्ट झाले आहे.
शुक्रवारी सौरभ कुमार यांनी पोलिस अधीक्षकांना याबाबत पत्र देत बनावट कागदपत्रांबाबत तक्रार केली आहे. सौरभ कुमार यांना 26 मार्च रोजी प्राप्तीकरने पोस्टाद्वारे ही नोटीस पाठवली होती. नोटीस पाहून ते आश्चर्यचकीत झाले होते.
तसेच त्यांना आता पुढे काय करायचे, याची चिंता लागून राहिली होती. सौरभ यांच्या माहितीनुसार त्यांच्या पॅन कार्डवर दोन जीएसटी नंबर घेतले गेले आहेत. त्याच्या माध्यमातून सुमारे 30 कोटी रुपयांचा व्यवहार झाला आहे.
सौरभ कुमार यांनी सांगितले की, सन 2022 मध्येही त्यांना आयकर विभागाकडून 14 कोटी रुपयांची नोटीस प्राप्त झाली होता. तेव्हा काही अज्ञातांनी मुद्दाम देण्यासाठीच हे केल्याचे लक्षात आले. त्यांनी वकीलामार्फत प्राप्तीकर विभागाला कोणताही जीएसटी नंबर घेतला नसल्याचे प्रत्युत्तर दिले. दरम्यान, 26 मार्च रोजी 16 कोटी रुपयांच्या व्यवहाराबद्दल त्यांना पुन्हा नोटीस आली.
तपास सुरू
सौरभ यांच्या पॅन कार्डवर एक जीएसटी नंबर "एचएआर इंटरप्राइजेज" यांच्या नावाने घेतला गेला आहे तर दुसरा "कविता इंडस्ट्रीज" यांच्या नावाने. हे दोन्ही जीएसटी नंबर दिल्लीतील पत्त्यावर घेतले गेले आहेत. सध्या हे दोन्ही जीएसटी नंबर रद्द केले गेले आहेत. आता सौरभ कुमार यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिस या प्रकरणाची तपासणी करत आहेत.