Delhi Police Bust Demonetised Notes Scam: नोटाबंदीच्या नऊ वर्षांनंतरही, दिल्लीत मोठ्या प्रमाणात 500 आणि 1,000 रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. दोन कारमध्ये एकूण 3.60 कोटी रुपये सापडले आहेत. उत्तर दिल्लीच्या वजीरपूर परिसरात पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. चौकशीदरम्यान, आरोपींनी सांगितले की, तरुण आणि आशिष नावाच्या दोन तरुणांनी कमिशनचे आमिष दाखवून या नोटा पाठवल्या होत्या. पोलीस आता या दोन्ही आरोपींचा शोध घेत आहेत.
ताब्यात घेतलेल्या चार जणांची ओळख हर्ष (22), टेकचंद ठाकुर (39), लक्ष्य (28) आणि विपिन कुमार (38) अशी आहे. चौकशीत त्यांनी हे नोटांचे बंडल नोएड्यातील तरुण आणि आशीष नावाच्या दोन व्यक्तींनी दिल्याचे सांगितले. पोलिस आता या दोघांच्या शोधात आहेत.
अटक केलेल्या आरोपींनी चौकशीत कबूल केले की त्यांनी लोकांना कमी किमतीत जुन्या नोटांचे बंडल देण्याचे आमिष दाखवले होते. ''आधार कार्ड दाखवले तर RBI या नोटा पुन्हा बदलून देईल.” असे ते सांगत होते. 2016 नंतर जुन्या नोटा बदलण्याची मुदत संपली असल्याचे सर्वांना माहीत असूनही या टोळीने लोकांची दिशाभूल केली.
DCP भीष्म सिंह यांच्या म्हणण्यानुसार, “या टोळीने जाणीवपूर्वक लोकांना जुन्या नोटांद्वारे गंडवण्याचा प्रयत्न केला. नोटा बदलण्यासाठी RBI कडून कोणतीही परवानगी नाही हे माहित असूनही त्यांनी खोटी माहिती देऊन पैसे उकळण्याचा प्रयत्न केला.”
अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की आरोपी 2021 पासून अशा प्रकारच्या व्यवहारात गुंतलेले होते आणि जुन्या नोटा बदलून देण्याच्या नावाखाली लोकांकडून पैसे उकळण्याचा त्यांचा डाव होता.
अशोक विहार पोलिस ठाण्यात खालील गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे—
भारतीय न्याय संहिता : फसवणूक, कट रचणे, गुन्ह्याचा प्रयत्न
स्पेसिफाइड बँक नोट्स कायदा 2017 अंतर्गत कलम 5 आणि 7
पोलिसांच्या मते, या व्यवहारामागे आणखी मोठे नेटवर्क असण्याची शक्यता असून त्याचा उलगडा करण्यासाठी तपास सुरू आहे.
आरोपींनी सांगितले की ते नोएड्यातील दोन व्यक्तींच्या संपर्कात होते, जे त्यांना मोबाईलद्वारे मार्गदर्शन करत होते. जुन्या नोटांचे गठ्ठे हलवण्यासाठी त्यांना 20% कमिशन देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.
पोलिसांसमोर चौघांनीही कबूल केले की “हो, आम्हाला माहित होतं की या नोटा बाळगणंही गुन्हा आहे. पण झटपट पैसे मिळतील म्हणून आम्ही हे काम केले.”
या घटनेनंतर पोलिसांसमोर अनेक मोठे प्रश्न उभे राहिले आहेत—
या नोटा इतक्या वर्षांनंतरही कुठून आणि किती प्रमाणात बाहेर येत आहेत?
यामागे मोठं रॅकेट आहे का?
देशभरात अजून किती नोटा लपवल्या आहेत?
पोलिसांनी सांगितले की पुढील तपास सुरू आहे आणि ते गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर व्यक्तींचा शोध घेत आहेत. चौकशीदरम्यान, आरोपींनी निष्पाप लोकांना फसवण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली आहे.