How to apply for e-visa : ई-व्हिसा (इलेक्ट्रॉनिक व्हिसा) हा एक डिजिटल प्रवास परवाना आहे. या माध्यमातून प्रवाशांना व्हिसासाठी ऑनलाइन अर्ज करता येतो. ही प्रणाली व्हिसा अर्ज प्रक्रिया सुलभ करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. यावर्षी भारतातील व्हिसा अर्जांपैकी तब्बल ८२ टक्के अर्ज २०२५ मध्ये ई-व्हिसाद्वारे दाखल झाले. २०२४ मध्ये हा आकडा ७९ टक्के होता, अशी माहिती एका रिपोर्टमधून समोर आली आहे. जाणून घेवूया ई-व्हिसा कसा काढतात याविषयी...
ई-व्हिसा (Electronic Visa) हा एक डिजिटल व्हिसा आहे. तो संबंधित देशाची सरकार ऑनलाईन जारी करते. हा पारंपरिक पेपर व्हिसापेक्षा वेगळा असतो. भारतीय प्रवाशांसाठी ई-व्हिसाद्वारे प्रवेश सुलभ करणाऱ्या देशांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राहण्याची मुदत, व्हिसाची वैधता आदींबाबत अधिक स्पष्ट नियम तयार केल्याने भारतीयांसाठी ई-व्हिसा मिळवणे सोपे झाले आहे. ई-व्हिसासाठी संबंधित देशाच्या दूतावासात किंवा वाणिज्य दूतावासात धावपळ करण्याची आवश्यकता नसते. अर्जदाराने फक्त ऑनलाईन अर्ज करायचा असतो, आवश्यक कागदपत्रे वेबसाइटवर अपलोड करायची असतात. काही वेळानंतर हा व्हिसा ई-मेलद्वारे डिजिटल स्वरूपात (PDF) मिळतो. त्याची प्रिंट काढून किंवा मोबाईलवर दाखवून त्या देशात प्रवास करता येतो.
अर्जदारांकडे व्हिसा अर्जाच्या तारखेपासून किमान सहा महिन्यांची वैधता असलेला पासपोर्ट असणे आवश्यक आहे.
सर्वप्रथमइंडियन ब्युरो ऑफ इमिग्रेशन (Bureau of Immigration - BoI)च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
येथे ई-व्हिसा विभागात जा. “सल्लागार” विभागात, तुम्हाला ई-व्हिसाच्या प्रकारांची यादी मिळेल.
योग्य व्हिसा प्रकारावर क्लिक करा. “ई-व्हिसासाठी येथे अर्ज करा” या आयकॉनवर क्लिक करा.
अर्जाचा फॉर्म तपशीलवार भरण्यास सुरुवात करा. त्यानंतर, सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
प्रक्रिया शुल्क भरा. अंतिम “सबमिट” बटणावर क्लिक करा.
ई-व्हिसासाठी अर्ज करणे अत्यंत सोपे आहे आणि तो कमी वेळेत मिळतो. सामान्य परिस्थितीत तीन दिवसांत व्हिसा मिळू शकतो, तर आपत्कालीन परिस्थितीत फक्त एका दिवसातही ई-व्हिसा जारी होतो.
टुरिस्ट ई-व्हिसा : पर्यटन, प्रवास किंवा कुटुंबीय व मित्रांना भेटण्यासाठी दिला जातो. याची वैधता साधारणतः ३० ते ९० दिवसांची असते.
बिझनेस ई-व्हिसा : व्यवसायिक बैठक, परिषद किंवा क्लायंट व्हिजिटसाठी दिला जाणारा व्हिसा. सहा महिने ते एक वर्ष इतका कालावधी याची वैधता असते.
मेडिकल ई-व्हिसा : उपचारासाठी परदेशात जाणाऱ्या रुग्णांना दिला जातो. हा तातडीने जारी केला जातो. रुग्णासोबत एक किंवा दोन नातेवाईकांनाही हा व्हिसा दिला जातो.
ट्रांझिट ई-व्हिसा : एका देशातून दुसऱ्या देशात प्रवास करताना मध्ये थोडा वेळ एखाद्या देशात थांबावे लागल्यास हा व्हिसा दिला जातो. तो साधारणतः ७२ तासांपासून ५ दिवसांपर्यंत वैध असतो.
एज्युकेशनल ई-व्हिसा : परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला जातो. हा व्हिसा कमाल पाच वर्षांपर्यंत वैध असू शकतो. त्याची मुदत विद्यार्थ्याच्या अभ्यासक्रमावर अवलंबून असते. याशिवाय सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी, वैज्ञानिक कारणांसाठी, परदेशात वार्तांकनासाठी जाणाऱ्या पत्रकारांना तसेच खेळाडूंनाही ई-व्हिसा दिला जातो.
व्हिसा प्रक्रियेसाठीची Atlys या प्लॅटफॉर्मच्या रिपोर्टनुसार, यूएई, व्हिएतनाम, इंडोनेशिया, हाँगकाँग आणि इजिप्त या देशांना २०२५ मध्ये भारतीय प्रवाशांनी ई-व्हिसासाठी सर्वाधिक पसंती दिली आहे. २०२५ मध्ये आशिया, आफ्रिका, युरोप, ओशिनिया आणि लॅटिन अमेरिका मिळून ५० हून अधिक देश भारतीय पासपोर्टधारकांना ई-व्हिसा किंवा इलेक्ट्रॉनिक ट्रॅव्हल ऑथरायझेशन (eTA) सुविधा उपलब्ध करून देत आहेत. श्रीलंकेसाठीची मागणी सर्वाधिक वाढली असून, २०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये अर्जांची संख्या तब्बल सातपट झाली. आशियाई देश या बाबतीत आघाडीवर असून श्रीलंका, व्हिएतनाम, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि इंडोनेशिया हे देश १४ ते ९० दिवसांच्या वास्तव्यासाठी ई-व्हिसा सुविधा देतात. व्हिएतनाम ९० दिवस वैध असलेल्या ई-व्हिसाद्वारे ३० दिवस राहण्याची परवानगी देतो. आफ्रिकेत इजिप्त, केनिया, टांझानिया, युगांडा आणि मोरोक्को या देशांनी ३० ते ९० दिवसांपर्यंत राहण्याची मुभा देत डिजिटल प्रवेश मोठ्या प्रमाणात खुला केला आहे. युरोपातील अल्बेनिया, मोल्दोव्हा आणि रशिया यांनीही भारतीयांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. त्याचबरोबर कॅरिबियन आणि लॅटिन अमेरिकन देशांमध्ये क्यूबा, सुरिनाम, कोलंबिया आणि बहामाज यांनी ई-व्हिसा प्रणाली लागू केली आहे.ओशिनियामधील ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांनी ई-व्हिसा व eTA प्रक्रियेत अधिक सुलभता आणत भारतीयांसाठी प्रवेश खुला केला आहे.