Viral Love Story 75 year old man marries 30 year old woman
औरैया (उत्तर प्रदेश): वयाची पंचाहत्तरी गाठलेला एक वृद्ध आणि त्याच्या ३० वर्षीय मुलीच्या मैत्रिणीच्या अनोख्या प्रेमप्रकरणाची सध्या संपूर्ण देशात चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर रील्स बनवण्याच्या निमित्ताने सुरू झालेला हा प्रवास आता थेट लग्नापर्यंत पोहोचला आहे. काही दिवसांपासून त्यांच्या साखरपुड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतानाच, आता या जोडप्याच्या हळदीचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. नवरात्रौत्सवानंतर त्यांचा विवाह संपन्न होणार आहे.
उत्तर प्रदेशमधील औरैया जिल्ह्यातील अरियारी गावातील ७५ वर्षीय रामसुगर आणि औरैया शहरात राहणारी ३० वर्षीय रानी राजपूत यांच्यात प्रेमसंबंध एका वर्षापूर्वी सुरू झाले. वयात तब्बल ४५ वर्षांचे अंतर असतानाही दोघांनी लग्नाचा घेतलेला हा निर्णय सध्या सर्वत्र कौतुकाचा आणि कुतूहलाचा विषय बनला आहे. काही दिवसांपूर्वी कुटुंबीयांच्या उपस्थितीत दोघांचा थाटामातात साखरपुडा पार पडला होता. साखरपुड्यानंतर आता लग्नापूर्वीचे इतर विधी पार पाडले जात आहेत. ढोल-ताशांच्या गजरात हळदी समारंभ साजरा करण्यात आला, ज्यामध्ये नातेवाईकांनी वराला हळद लावली. नवरात्रीनंतर एका शुभ मुहूर्तावर ते विवाहबंधनात अडकणार आहेत.
या अनोख्या प्रेम प्रकरणाची सुरुवात सोशल मीडियावरून झाली. रामसुगर यांची मुलगी राधा ही इंस्टाग्रामसह विविध प्लॅटफॉर्म्सवर व्हिडिओ बनवून पोस्ट करायची. राणी राजपूत ही राधाची मैत्रीण होती आणि ती अनेकदा राधाच्या घरी रील्स व व्हिडिओ बनवण्यासाठी येत असे. या भेटीगाठींदरम्यान रामसुगर आणि राणी यांच्यात जवळीक निर्माण झाली. ओळखीचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले, ज्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
रामसुगर यांच्या पहिल्या पत्नीचे सात वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यांना एक मुलगा आणि तीन मुली असून सर्वजण विवाहित आणि आपापल्या संसारात रमले आहेत. पत्नीच्या निधनानंतर रामसुगर घरात पूर्णपणे एकाकी पडले होते. दुसरीकडे, राणीचाही आधी विवाह झाला होता आणि तिला दोन मुले आहेत. राणीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सांगितले की, तिचा पहिला पती तिला सोडून गेला होता. आयुष्यातील कठीण प्रसंगांत तिला रामसुगर यांच्या रूपाने एक आधार आणि खरा जोडीदार मिळाला.
दोन्ही कुटुंबांच्या सहमतीने हा विवाह ठरवण्यात आला आहे. नवरात्रीनंतर होणाऱ्या या लग्नसोहळ्यात केवळ मोजकेच कुटुंबीय आणि जवळचे नातेवाईक उपस्थित राहणार आहेत. वयाच्या या टप्प्यावर पोहोचलेले रामसुगर आणि आपल्या भूतकाळातील दुःख मागे सारून नव्या आयुष्याची सुरुवात करणाऱ्या रानी यांच्या या निर्णयाची सध्या उत्तर प्रदेशसह देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे.