Remona Evette Pereira Bharatanatyam world record 170 hour dance marathon
मंगळुरू : सात दिवस, 170 तास, अखंड भरतनाट्यम सादरीकरण! हे वाचून आश्चर्य वाटेल पण ही कामगिरी करून दाखवली आहे मंगळुरूच्या रेमोना इव्हेट पेरेरा या विद्यार्थिनीने. सेंट अॅलॉशियस (मान्यताप्राप्त) विद्यापीठात बी.ए. अंतिम वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या रेमोनाने भरतनाट्यमचे सलग 170 तासांचे सादरीकरण करत एक नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे.
ही ऐतिहासिक कामगिरी कॉलेजच्या रॉबर्ट सिक्वेरा हॉलमध्ये 21 जुलै रोजी सकाळी 10 वाजता सुरू होऊन 28 जुलै रोजी दुपारी 12 वाजता संपली. रेमोनाच्या या विक्रमाची नोंद Golden Book of World Records मध्ये झाली असून, या संस्थेचे प्रतिनिधी संपूर्ण कार्यक्रमाच्या वेळेत उपस्थित होते आणि त्यांनी संपूर्ण नृत्य सादरीकरणाचे दस्तऐवजीकरण केले.
या आधीचा विक्रम 127 तासांचा होता, जो सुधीर जगताप यांनी प्रस्थापित केला होता. रेमोनाने तो विक्रम तब्बल 43 तास अधिक नृत्य करत मोडीत काढला आहे.
13 वर्षांपासून भरतनाट्यमचे प्रशिक्षण घेत असलेल्या रेमोनाने याआधी देखील अनेक विक्रम नोंदवले आहेत. यावेळी तिच्या तयारीचा भाग म्हणून ती दररोज 5-6 तास सराव करत होती आणि त्याचबरोबर आपले शैक्षणिक अभ्यासक्रमही पूर्ण करत होती.
170 तासांच्या नृत्य सादरीकरणात तिने दर तीन तासांनी 15 मिनिटांचा छोटासा विश्रांती कालावधी घेतला. या वेळेत ती केळी, ताक, नारळपाणी आणि मऊ भात यांचे सेवन करत होती. तिच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी डॉक्टर आणि रुग्णवाहिका कर्मचारी सातत्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात रेमोनाने गणपती स्तोत्राने केली तर सांगता देवी दुर्गेला अर्पण केलेल्या भक्तिपर कथानाट्याने झाली. तिच्या नृत्यातील पावलांची अचूकता, मुद्राभिव्यक्ती आणि नृत्यरचना सातत्याने दर्जेदार होती. संपूर्ण कार्यक्रमात तिने विविध भरतनाट्यम शैलींचे सादरीकरण केले.
कार्यक्रमानंतर Golden Book of World Records चे इंडिया प्रतिनिधी मनीष विष्णोई यांनी तिला सन्मानचिन्ह प्रदान केले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रविण मार्तीस यांनी तिच्या चिकाटीचे आणि समर्पणाचे कौतुक केले.
रेमोना परत आल्यानंतर तिच्या सहाध्यायी विद्यार्थ्यांनी तिचे स्वागत भरतनाट्यमच्या मिरवणुकीद्वारे केले. सोशल मीडियावरदेखील लोक तिच्या कामगिरीबद्दल स्तिमित झाले असून अनेकांनी तिला “सुपरह्यूमन” म्हटले आहे.
मानसिक आणि शारीरिक क्षमतेच्या सीमा ओलांडत रेमोना इव्हेट पेरेराने जो विक्रम केला आहे, तो केवळ एका व्यक्तीचा नाही, तर भारतीय शास्त्रीय नृत्यपरंपरेचा आणि युवकांच्या असामान्य क्षमतेचा गौरव आहे. तिचा विक्रम भविष्यात अनेक कलाकारांसाठी प्रेरणास्थान ठरणारा आहे.
वयाच्या तिसऱ्या वर्षापासून रेमोना भरतनाट्यमचे प्रशिक्षण सुरू केले होते. तिच्या गुरू श्री विद्या मूळ्यधर यांच्या मार्गदर्शनाखाली तिने 2019 मध्ये तिचे रंगप्रवेश पूर्ण केले. तिला 2022 मध्ये कला आणि संस्कृती क्षेत्रात उत्कृष्ठतेसाठी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार (PMRBP) हा प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाला.
विविध नृत्य शैली आत्मसात
भरतनाट्यम व्यतिरिक्त, रेमोनाने सेमी-क्लासिकल, हिप-हॉप, लॅटिन, बॉलिवूड, बॉलरूम आणि अॅक्रोबॅटिक नृत्यशैलीतही प्रशिक्षण घेतले आहे. तिच्या सादरीकरणात तिने तुटलेल्या काचा वर नृत्य करणे, आगीच्या कंदिलांसह नृत्य करणे, आणि इतर साहसी नृत्य प्रयोग केले आहेत.