4 Army Jawans killed in encounter with terrorists
दहशतवाद्यांच्या गोळीबारात पाचजण शहीद.  Pudhari File photo
राष्ट्रीय

जम्मू-काश्मीर : दहशतवादी हल्ल्यात कॅप्टनसह 5 जवान शहीद

पुढारी वृत्तसेवा

जम्मू/दार्जिलिंग : जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यातील देसा वन क्षेत्रात दहशतवाद्यांच्या गोळीबारात लष्करातील कॅप्टनसह चार जवान तसेच एक पोलिस कर्मचारी, असे पाचजण शहीद झाले. राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-काश्मीर पोलिस दलाकडून सोमवारपासूनच या भागात शोधमोहीम सुरू आहे. रात्री दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार केला व दाट जंगलात ते पळून गेले. जखमी अवस्थेत लष्कराने जवानांना रुग्णालयात दाखल केले होते. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

राष्ट्रीय रायफल्सचे कॅप्टन ब्रिजेश थापा, कॉन्स्टेबल ब्रिजेंद्र सिंह, कॉन्स्टेबल अजयसिंह नरुका, डी. राजेश अशी शहीद जवानांची नावे आहेत. कॅप्टन थापा हे पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगचे, तर ब्रिजेंद्र सिंह, अजयसिंह नरुका हे दोघे राजस्थानातील झुंझुनूचे रहिवासी होते. जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेशी संबंधित ‘काश्मीर टायगर्स’ या स्थानिक दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. ‘काश्मीर टायगर्स’ने 12 जवान शहीद झाल्याचा दावा केला आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी हल्ल्यासंदर्भात लष्करप्रमुखांशी चर्चा केली. दहशतवाद्यांचा हेलिकॉप्टरने शोध घेतला जात आहे. जम्मू विभागातील डोडा येथे गेल्या 34 दिवसांतील ही पाचवी चकमक आहे. यापूर्वी 9 जुलै रोजी चकमक झाली होती. 26 जून रोजी येथे दोन आणि 12 जून रोजी दोन हल्ले झाले. यानंतर सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. त्यात तीन दहशतवादी मारले गेले. जम्मू विभागात गेल्या 78 दिवसांत 11 दहशतवादी हल्ले झाले आहेत.

तीन दिवसांनी घरी येणार होते; पण...

कॉन्स्टेबल अजयसिंह नरुका यांचे वडील कमलसिंह नरुकाही लष्करात होते. अजय तीन दिवसांनी घरी भैसावता कलां (झुंझुनू) येथे येणार होते; पण आता त्यांचे पार्थिवच येईल. कॉन्स्टेबल ब्रिजेंद्र सिंह यांनी घरी येण्यासाठी म्हणून 5 दिवसांपूर्वी सुट्टी टाकली होती; पण मंजूर झाली नाही. त्यांच्यामागे पत्नी अंकिता आणि 2 मुले आहेत.

कलम 370 रद्द केल्याचा राग; निवडणुका उधळण्याचा कट

जम्मू-काश्मीरला स्वायत्तता देणारे कलम 370 केंद्र सरकारने रद्द केल्यानंतर फुटीरवाद्यांमध्ये नैराश्य पसरले आहे. सरकारने लोकसभा निवडणुका यशस्वीरीत्या घेतल्या. आता विधानसभा निवडणुका घेण्याची तयारीही केंद्राने चालविल्याने तसे घडू नये, निवडणुका होऊ नयेत, या उद्देशानेही हल्ले वाढलेले आहेत. पाकिस्तानातून त्यांना रसद पुरवली जात आहे.

जम्मूतील हिंदूंची गावे लक्ष्य

दहशतवादाचे शिफ्टिंग काश्मीरमधून जम्मू विभागात झालेले आहे. जम्मू विभाग हिंदूबहुल आहे. दहशतवाद्यांच्या टार्गेटवर जम्मू विभागातील हिंदू गावे आहेत. इथेही हिंदू समुदायावर दहशत बसविणे, हा या हल्ल्यांचा उद्देश आहे.

SCROLL FOR NEXT