दहशतवाद सर्वात मोठे आव्हान : मोदी

दावोस (स्वित्झर्लंड) : श्रीराम जोशी

पर्यावरणात झपाट्याने होत असलेले बदल, दहशतवाद आणि जागतिकीकरणातील आत्मकेंद्रीपण ही सध्याची विश्‍वासमोरील सर्वात मोठी आव्हाने असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम' परिषदेत (डब्ल्यूईसी) केले. दावोस परिषदेत भारताचा बोलबाला दिसून येत आहे. या पार्श्‍वभूमीवर मोदी यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. विशेष म्हणजे, मोदी यांनी तासभराहून अधिक काळ हिंदीतून भाषण केले. काही देशांनी चांगला आणि वाईट अशा दहशतवादाच्या दोन व्याख्या केल्या आहेत. सर्वात धोकादायक बाब म्हणजे, या व्याख्या कृत्रिमरीत्या तयार करण्यात आल्या असल्याचे मोदी यांनी पाकिस्तानचे नाव न घेता सांगितले.

जगासमोरील आव्हानांचा ऊहापोह करताना मोदी म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून तंत्रज्ञानात अतिशय झपाट्याने बदल होत आहे. तर दुसरीकडे वेगवेगळ्या प्रकारची आव्हानेही निर्माण झाली आहेत. तंत्रज्ञानावर आधारित जे बदल होत आहेत, त्यामुळे लोकांचे जगणे प्रभावित होत आहे. डेटा अर्थात माहितीचे भांडार ज्याच्याकडे त्याचा आगामी काळात दबदबा वाढणार आहे. जागतिक राजकारण आणि अर्थव्यवस्थांवर प्रभाव टाकण्याची जबरदस्त क्षमता तंत्रज्ञानात आहे. सोशल मीडियामध्ये समाजाला जोडण्याची आणि तोडण्याची ताकद आहे, त्यामुळे सोशल मीडियाचा जपून वापर करणे आवश्यक आहे. आर्थिक क्षमता आणि राजकीय शक्‍तींची परिणामे यामध्येही झपाट्याने बदल होत आहेत. याआधी जेव्हा 1996 साली भारताचे पंतप्रधान दावोसमध्ये आले होते, तेव्हा देशाची अर्थव्यवस्था 400 अब्ज डॉलर्सची होती. आता भारतीय अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्सच्या आसपास असून, भारताच्या अर्थव्यवस्थेत सहापटीने वाढ झाली आहे. वेगाने विकसित होत असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश असला, तरी लैंगिक भेदभाव, पर्यावरण, गरीब-श्रीमंत यांच्यातील दरी अशी गंभीर आव्हाने भारतासमोर आहेत.

चांगला आणि वाईट दहशतवाद यांच्यात कृत्रिमरीत्या फरक तयार करण्यात आला असल्याचा आरोप मोदी यांनी केला. दहशतवादाच्या मुद्द्यावर भारताची भूमिका सर्वश्रुत आहे. शांतता, सुरक्षितता आणि स्थैर्य कायम राहण्यासाठी सर्व देशांनी एकत्रितपणे येऊन दहशतवादाचा मुकाबला केला पाहिजे, असेही मोदी यांनी नमूद केले. जागतिकीकरण वाढले असले, तरी अनेक देश आत्मकेंद्री होत असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की, संयुक्‍त राष्ट्र संघ, जागतिक व्यापार संघटना यांचे कामकाज सुरळीत चालले असले, तरी त्यात काळानुरूप बदल होणेही तितकेचे गरजेचे आहे. जागतिक आत्मकेंद्रीपण पर्यावरण बदल आणि दहशतवादाइतकेच धोकादायक आहे. दोन देशांदरम्यानचे व्यापार करार, आर्थिक सौहादर्र् कमी होताना दिसत आहे. जागतिकीकरणाची चमक कमी होणे, ही निश्‍चितपणे चांगली बाब नाही. 

विविधतेतून एकता हा भारताचा पुरातन मंत्र आहे. प्राचीन ऋषी-मुनींनी दिलेल्या उपदेशांचा आदर्श घेत भारताची वाटचाल सुरू आहे, असे सांगत मोदी म्हणाले की, भारतात अनेक धर्म-जाती, संस्कृती, भाषा, खाणपान आहे. मात्र, असे असूनही लोकशाही व्यवस्थेवर चाललेला हा जगातला सर्वात मोठा देश आहे. भारतातली लोकशाही ही केवळ राजकारण खेळण्यापुरती असलेली लोकशाही नसून, ते एकप्रकारचे भारत दर्शन आहे. तीस वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर 2014 साली केंद्रात भाजपने बहुमताचे सरकार स्थापन केले. लोकांनी विकासाच्या बाजूने दिलेला हा कौल होता. सबका साथ, सबका विकास… हा द‍ृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मागील साडेतीन वर्षांत सरकारने विविध योजना राबविलेल्या आहेत. जनधन योजना असो की, करप्रणालीत आमूलाग्र बदल घडवून आणणारी 'जीएसटी'प्रणाली असो. पारदर्शकता आणि जबाबदारी निश्‍चित करण्यासाठी तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करण्याचे सरकारचे धोरण आहे. दीर्घकाळात याचे चांगले परिणाम होणार आहेत. लायसेन्स अर्थात परमिटराज करण्याचा विडा आमच्या सरकारने उचललेला आहे. अनेक बाबतीत देशाचे मानांकन सुधारले आहे, हे विविध क्षेत्रांत सातत्यपूर्ण सुरू असलेल्या कामांचे फलितच आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news