Telangana Crime News
हैदराबाद: प्रेमप्रस्ताव नाकारल्याच्या रागातून २१ वर्षीय तरुणीचा भररस्त्यात गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना शनिवारी महबूबनगरमधील जडचेरला शहरात घडली. गेल्या काही दिवसांपासून संशयीत आरोपी मृत तरुणीचा पाठलाग करत होता.
वाय. वैष्णवी असे मृत तरुणीचे नाव असून, ती जडचेरला येथील एका खासगी शाळेत रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. संशयीत आरोपी गेल्या काही दिवसांपासून प्रेमाच्या नावाखाली तिचा पाठलाग करून तिला त्रास देत होता, असे पोलिसांनी सांगितले.
शनिवारी नेहमीप्रमाणे वैष्णवी बसमधून उतरून पायी चालत जात असताना, आरोपीने तिच्यावर हल्ला केला. भररस्त्यात तिच्यावर चाकूने सपासप वार करत तिचा गळा चिरला. या जीवघेण्या हल्ल्यात वैष्णवी रक्ताच्या थारोळ्यात पडली. हा थरार पाहून स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तिला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, प्रचंड रक्तस्राव झाल्यामुळे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.