Terrorists killed Jammu and Kashmir Udhampur
जम्मु-काश्मीर: जम्मु-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात बुधवारी रात्री उशिरा सुरक्षा दलांनी राबवलेल्या विशेष मोहिमेत पाकिस्तानस्थित 'जैश-ए-मोहम्मद'चे दोन दहशतवादी ठार झाले. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून परिसरात अजूनही शोधमोहीम सुरू आहे.
या भागात काही संशयित हालचाली होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर, सुरक्षा दलांनी परिसरात तातडीने शोधमोहीम हाती घेतली. या शोधमोहिमेदरम्यान सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक उडाली.
आज पहाटेच्या सुमारास सुरक्षा दलांना दोन्ही दहशतवाद्यांचे मृतदेह सापडले. हे परदेशी दहशतवादी असून ते बहुदा 'जैश-ए-मोहम्मद'चे असावेत, असा संशय आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. राष्ट्रीय रायफल्स, पॅरा (स्पेशल फोर्सेस) आणि जम्मु-काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई पार पाडली. भारतीय लष्कराच्या 'व्हाईट नाईट कॉर्प्स'ने म्हटले आहे की, "१६ आणि १७ सप्टेंबरच्या मध्यरात्री उधमपूरमधील ब्रट्टल येथे गुप्तचर माहितीवर आधारित संयुक्त मोहिमेदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. ही मोहीम अजूनही सुरू असून, संबंधित भागात शोध आणि पाळत ठेवण्याचे काम चालू आहे."
५ सप्टेंबर रोजी मध्य काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात लष्कर-ए-तोयबाच्या एका पाकिस्तानी कमांडरला ठार केले होते. 'यासीर' असे नाव असलेला हा दहशतवादी लष्करच्या मोठ्या सुलेमान मुसा गटाचा एक भाग होता.
सूत्रांच्या माहितीनुसार, त्याने जवळपास एक वर्षापूर्वी या गटातून वेगळे होऊन स्वतंत्रपणे कारवाया सुरू केल्या होत्या. सुरक्षा यंत्रणा बडगामच्या युसमर्ग परिसरात मागील काही काळापासून यासीरच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून होत्या. दरम्यान, या संपूर्ण कारवाईमुळे सुरक्षा दलांनी परिसरात दहशतवाद्यांचे मोठे मनसुबे उधळून लावले असून, संपूर्ण भागात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.