AI business success story
नवी दिल्ली : जेव्हा यशस्वी तरुण संस्थापकांबद्दल चर्चा होते, तेव्हा ती सहसा प्रतिष्ठित महाविद्यालये, मजबूत नेटवर्क किंवा आर्थिक पाठबळ या मुद्द्यांपासून सुरू होते. पण १९ वर्षीय आयुष सिंहची कहाणी यापेक्षा वेगळी आणि प्रेरणादायी आहे. कोणत्याही आयआयटी किंवा एमआयटी सारख्या नामांकित संस्थेची पदवी नसतानाही आयुषने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय उभा केला असून आज तो दरमहा सुमारे १ कोटी रुपये कमावत आहे.
एक्सवरील एका पोस्टनुसार, आयुष सिंहचा प्रवास अवघ्या १३ व्या वर्षी सुरू झाला. कोविड-१९ महामारीमुळे त्याच्या कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले, तेव्हा त्याने स्वतःहून 'मशीन लर्निंग' शिकण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्याच्याकडे अत्याधुनिक साधने नव्हती. जुने ऑनलाइन कोर्सेस, खंडित इंटरनेट कनेक्शन आणि एक साधा लॅपटॉप त्याच्याकडे होता. मात्र, त्याने हार न मानता AI आणि मशीन लर्निंगचे शिक्षण सुरू ठेवले.
पोस्टनुसार, आयुषने आपल्या सुरुवातीच्या किशोरवयात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगचा सखोल अभ्यास केला. काही महिन्यांतच त्याला परदेशातील स्टार्टअप्ससोबत काम करण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे, वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी त्याने तयार केलेल्या कोर्सची एमआयटीकडून सार्वजनिकरीत्या शिफारस केली. यामुळे त्याच्या कामाला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली.
पुढील काही वर्षांत, आयुषने अमेरिकेतील एका स्टार्टअपसाठी 'नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग' प्रणालींवर काम केले आणि 'एमएल-ऑप्स' इंजिनिअर व डेटा सायंटिस्ट म्हणूनही भूमिका बजावल्या. जसा त्याचा तांत्रिक अनुभव वाढला, तशीच त्याची महत्त्वाकांक्षाही वाढली. पोस्टनुसार, आयुषने पुढे 'अँटर्न'ची स्थापना केली आणि नंतर 'सेकंड ब्रेन लॅब्स'चा सहसंस्थापक बनला.
तांत्रिक क्षेत्रात यश मिळूनही सुरुवातीला त्याच्या अध्यापनातून अपेक्षित आर्थिक लाभ मिळत नव्हता. तो शेकडो विद्यार्थ्यांना आणि अभियंत्यांना AI शिकवत होता, परंतु त्या कौशल्याचे योग्य व्यावसायिक रूपांतर करण्यात अडचणी येत होत्या. पोस्टनुसार, समस्या ज्ञानात नव्हती तर ते सादर करण्याच्या आणि विक्रीसाठी योग्य पद्धतीने मांडण्याच्या प्रक्रियेत होती. योग्य ब्रँडिंग, पॅकेजिंग आणि व्यवसाय मॉडेल तयार झाल्यानंतर परिस्थिती बदलली.
सध्या आयुष सिंह Topmate या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून भारतातील शेकडो अभियंत्यांना AI प्रशिक्षण देत आहे. त्याच्या मार्गदर्शनामुळे अनेकांना तंत्रज्ञान क्षेत्रात नवीन संधी मिळत आहेत. एकेकाळी केवळ आवडीपोटी शिकलेले कौशल्य आज त्याच्यासाठी मोठ्या व्यवसायाचे रूप घेतले आहे. AI शिक्षण क्षेत्रातील त्याच्या उपक्रमातून तो दरमहा जवळपास १ कोटी रुपयांची कमाई करत असल्याचे या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.