Telangana Accident News:
खडी घेऊन जाणारा ट्रक आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसचा समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात १९ जणांचा मृत्यू झाला आहे. हा आज (दि. ३ नोव्हेंबर) अपघात तेलंगणा येथील विकाराबाद जिल्ह्यातील मिरजागुडा येथे झाला आहे. चेवेल्ला येथील एसीबी बी कृष्णन यांनी दिलेल्या माहितीनुसार TGSRTC बस टंदूर येथून निघाली होती. ती चेवेल्ला इथं पोहचणं अपेक्षित होतं. मात्र मिरजागुडा इथं तिचा अपघात झाला.
बी कृष्णन म्हणाले की, 'खडी वाहून नेणारा एक ट्रक वसच्या विरूद्ध दिशेनं येत होता. तो बसवर आदळून झालेल्या अपघातात आतापर्यंत १९ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यात ट्रक चालक आणि बसमधील अनेक प्रवाशांचा समावेश आहे.'
दरम्यान रांजेंद्रनगर डीसीपी योगेश गौतम यांनी दिलेल्या माहितीनुसार खडीने भरलेला ट्रक ज्यावेळी बसवर धडकला त्यावेळी तो त्याच्या योग्य लेनमध्ये होता. डीसीपींनी सांगितलं की, 'आम्हाला ट्रक ड्रायव्हर हा ओव्हरटेक करताना हा अपघात झाला की तो चुकीच्या लेनमधून ट्रक चालवत होता याची खात्री करून घ्यावी लागेल.
ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी बसमध्ये ५० पेक्षा जास्त प्रवासी होते. ज्यावेळी खडीने भरलेला ट्रकचा आणि बसचा अपघात झाला त्यावेळी ट्रक हा बसवर उलटला झाला. डीसीपींनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात बिजापूर महामार्गावर झाला. आम्ही बसमधून मृतदेह आणि जखमींना बाहेर काढत आहोत. जखमींना रूग्णालायत दाखल करत आहोत. दरम्यान, या माहामार्गावरील दोन्ही बाजूंचं ट्रॅफिक हे वळवण्यात आलं आहे.
तेलंगणाच्या मुख्यमंत्री कार्यालयानं या अपघातानंतर ट्विट केलं आहे. मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी या अपघातावर दुःख व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना त्वरित घटनास्थळी जाण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर योग्य ते बचावकार्य करण्यास देखील सांगितलं आहे. त्याचबरोबर या अपघाताबाबतची सखोल माहिती वेळोवेळी कळवण्यात यावी असे देखील आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी जखमींना त्वरित हैदराबाद इथं हलवण्यात यावं असे आदेश डीजीपींना दिले आहेत. तसंच जे उपलब्ध मंत्री आहेत त्यांना त्वरित अपघाताच्या ठिकाणी जाण्याचे देखील आदेश मुख्यमंत्री रेड्डी यांनी दिलेत.