कन्नड अभिनेता दर्शनला बंगळूरच्या मध्यवर्ती कारागृहात VIP ट्रिटमेंट. File Photo
राष्ट्रीय

१५ फोन, ५ चाकू, ऑम्लेट स्टोव्ह सापडला; जेलमध्ये अभिनेता दर्शनचा VIP थाट

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

प्रसिद्ध कन्नड अभिनेता दर्शन थुगुदीपा (actor Darshan) हा त्याचा चाहता रेणुकास्वामीचे (Renukaswamy Murder) अपहरण आणि हत्येच्या आरोपाखाली सध्या गजाआड आहे. दरम्यान, पोलिसांनी शनिवारी केलेल्या छापेमारीत बंगळूरच्या मध्यवर्ती कारागृहाच्या (Bengaluru Central Prison) एक बराकमध्ये १.३ लाख रुपये किमतीच्या सॅमसंग डिव्हाइससह १५ मोबाईल फोन, सात इलेक्ट्रिक मड स्टोव्ह्ज, पाच चाकू, तीन मोबाईल फोन चार्जर, दोन पेन ड्राईव्ह, ३६ हजार रुपये रोख रक्कम, सिगारेट, विडीची पाकिटे, माचिस बॉक्स असे साहित्य जप्त केले.

Bengaluru Central Prison : लॉनवर बसून गँगस्टर्स सोबत घेत होता ड्रिंक

खुनाचा आरोप असलेल्या दर्शन थुगुदीपा याचा तुरुंगात गँगस्टर्स विल्सन गार्डन नागा सोबतचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यात तुरुंगाच्या आवारातील लॉनवर बसून सिगारेट ओढत ड्रिंक घेत असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर तुरुंगात दर्शनला दिल्या जात असलेल्या व्हीआयपी सुविधांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. याची दखल घेत दक्षिण विभागाच्या पोलिसांनी छापेमारीची कारवाई केली. या प्रकरणी तुरुंग प्रशासनातील १२ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित केले. तसेच दर्शन आणि त्याच्या साथीदारांना वेगवेगळ्या कारागृहात हलवण्यात आले आहे.

शनिवारी पोलिसांनी टाकलेला छापा हा नागा ज्या बराकमध्ये आहे; त्या बराकपुरता मर्यादित होता. पोलिस उपायुक्त (दक्षिण पूर्व) सारा फातिमा यांच्या नेतृत्वाखाली ४० जणांचे पोलिस पथक शनिवारी दुपारी ४.३० च्या सुमारास तुरुंगात दाखल झाले होते. येथील कैद्यांना बाहेर काढल्यानंतर नागाच्या बराकची झाडाझडती घेण्यात आली. रात्री आठ वाजेपर्यंत हा छापा सुरू होता.

पाईपमध्ये गुंडाळलेले ११ मोबाईल्स सापडले

या छाप्यादरम्यान वीज नियंत्रण कक्षाच्या रिकाम्या स्वीचबोर्डमध्ये चार मोबाईल्स तर एका सेलमधील स्वच्छतागृहात पाण्याच्या पाईपमध्ये गुंडाळलेले ११ मोबाईल्स सापडले. येथून २ इलेक्ट्रिक स्टोव्ह जप्त केले असून या स्टोव्हचा वापर चहा, ऑम्लेट आणि इतर खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी केला जात होता, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. तसेच ३ मोबाईल चार्जरही सापडले होते.

नेमकं काय घडलं होतं?

अभिनेता दर्शन याला ११ जून रोजी रेणुकास्वामी या ३३ वर्षीय चाहत्याच्या हत्येप्रकरणी अटक केली होती. रेणुकास्वामीने दर्शनाची जोडीदार अभिनेत्री पवित्रा गौडा हिला आक्षेपार्ह मेसेज पाठवला होता. ही हत्या अत्यंत क्रूर पद्धतीने केली असल्याचे बंगळूर पोलिसांनी म्हटले होते. या हत्येप्रकरणी दर्शन आणि पवित्र गौडा यांच्यासह १७ जणांना अटक करण्यात आली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT