Nagpur girl zipline fall Manali accident Trisha Bijwe tourism safety video viral
मनाली (हिमाचल प्रदेश) : हिमाचल प्रदेशातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ मनाली येथे सहलीसाठी गेलेल्या नागपूरच्या 12 वर्षीय त्रिशा बिजवे या मुलीच्या साहसी झिपलाइन राईडने एक भयावह वळण घेतले. झिपलाइन चालू असताना हार्नेसला जोडलेली दोरी तुटल्याने त्रिशा थेट खडकाळ दरीत कोसळली.
या घटनेत त्रिशा गंभीर जखमी झाली असून सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही धक्कादायक घटना मागील आठवड्यात घडली असून तिचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
त्रिशा बिजवे आपल्या कुटुंबासोबत मनालीला सुट्टीसाठी गेली होती. झिपलाइन राईड करत असताना अचानक तिच्या हार्नेसला जोडलेली सुरक्षा दोरी तुटली आणि ती सुमारे 30 फूट खोल खडकाळ दरीत कोसळली. या घटनेचा व्हिडिओ उपस्थित पर्यटकांनी चित्रित केला असून, तो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला आहे.
त्रिशाला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, जिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत.
कुटुंबीयांच्या माहितीनुसार, त्रिशाला या अपघातात अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झाले असून काही दिवसांपूर्वी तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तिच्या वडिलांनी प्रफुल्ल बिजवे यांनी सांगितले की, "त्रिशाची प्रकृती सध्या स्थिर आहे. डॉक्टरांचे पथक सातत्याने तिच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे."
बिजवे कुटुंबाने झिपलाईन ऑपरेटरवर गंभीर निष्काळजीपणाचा आरोप करत, सुरक्षा व्यवस्थेचा संपूर्ण अभाव होता असे सांगितले आहे. "ना आपात्कालीन मदतीसाठी तत्काळ सुविधा होती, ना पुरेशा प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची उपस्थिती," असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
या घटनेनंतर स्थानिक पोलिस आणि पर्यटन विभागाने घटनेची गंभीर दखल घेतली असून, साहसी पर्यटनात वापरल्या जाणाऱ्या उपकरणांच्या सुरक्षा प्रोटोकॉलची चौकशी सुरू आहे.
मनालीचे उपविभागीय पोलिस अधिकारी (DSP) यांनी सांगितले की, "परिवार आणि झिपलाईन ऑपरेटर यांच्यात परस्पर सहमतीने काही गोष्टी निश्चित झाल्या आहेत. मात्र, प्रशासनाच्या वतीने अधिकृत चौकशी सुरू असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर नियम लागू करण्यात येणार आहेत."