पुढारी ऑनलाईन डेस्क : मंगळवारी सकाळी कर्नाटकातील एनएच-150A महामार्गावर चल्लाकेरे आणि बळ्ळारी दरम्यान, भीषण अपघात झाला. या अपघातात दोन लहान मुलांसह तिघांचा मृत्यू झाला. हा अपघात चित्रदुर्ग जिल्ह्यातील मोनाकळमूर तालुक्यातील बोम्मक्कनहळ्ळी मशीद जवळ घडला. या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सीसीटीव्ही फुटेजनुसार, कार हायवे डिव्हायडरला धडकून सलग १५ वेळा पलटी झाली. त्यानंतर त्यामधील तिघेजण हवेत उडताना दिसले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातातील मृतांमध्ये कार चालवणारे मौला अब्दुल (३५) आणि त्यांची दोन मुले रहमान (१५) आणि समीर (१०) यांचा समावेश आहे. या अपघातात मौला यांची पत्नी सलीमा बेगम (३१), त्यांची आई फातिमा (७५) आणि आणखी एक मुलगा हुसेन गंभीर जखमी झाला. पोलिसांनी त्यांना तातडीने बळ्ळारी व्हीआयएमएस रुग्णालयात हलवले. हे कुटुंब मूळचे यादगीरचे असून, बंगळूरमध्ये कामगार म्हणून राहत होते. पोलिसांच्या माहितीनुसार, कार बंगळूरहून यादगीरकडे जात असताना हा अपघात घडला. पीएसआय महेश होसपेटे यांनी घटनास्थळी तपासणी केली. यानंतर घटनास्थळी पंचनामा करण्याचे काम पोलिसांकडून सुरु आहे. हा अपघात रामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला.
दुसऱ्या एका घटनेत, गुरुवारी सकाळी बंगळूरच्या बाहेर असलेल्या सुलिबेलेजवळ एका थांबलेल्या ट्रकला एसयूव्हीने धडक दिली. यात ३५ वर्षीय एक डेंटिस्टचा मृत्यू झाला. भरधाव गाडी चालवताना चालक गुगल मॅप्सचा वापर करत होता. यादरम्यान अपघात घडला.