मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : टेनिस स्पर्धेतील पुरुष गटातही महाराष्ट्राने विजय सलामी करताना हरियाणाला २-० ने पराभूत केले. एकेरीच्या पहिल्या लढतीत १४ वर्षीय खेळाडू मानस धामणे याने अजय मलिक या अनुभवी खेळाडूला ६-२, ६-२ असे निष्प्रभ केले. खोलवर सर्व्हिस व परतीचे खणखणीत फटके असा चतुरस्त्र खेळ करीत मानस याने या सामन्यात वर्चस्व गाजविले. मानस याची ही पहिलीच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आहे.
दुसऱ्या लढतीत अर्जुन कढे याच्याविरुद्ध खेळताना हरियाणाचा खेळाडू करण सिंघ याने पाठीच्या स्नायूच्या दुखापतीमुळे सामना सोडला. पहिला सेट करण सिंघ याने ७-६ (७-५) असा घेतला होता. या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी तुल्यबळ दाखवत खेळ केला. दुसऱ्या सेट पूर्वी करण याला पाठीतील वेदनांचा त्रास जाणवू लागला. त्याने तात्पुरते उपचार घेतले आणि तो मैदानावर उतरला. अर्जुन याने सलग तीन गेम्स घेतल्यानंतर करण याने सामन्यातून माघार घेतली. त्यामुळे अर्जुनला विजयी घोषित करण्यात आले. दुसऱ्या सेटमध्ये अर्जुन याला चांगला सूर सापडला होता.
हेही वाचा