अहमदाबाद, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघानी ३६ व्या नॅशनल गेम्सची (National Games Gujarat 2022) उपांत्य फेरी गाठली आहे. सोनाली शिंगटे, अंकिता जगताप आणि सायली यांच्या सर्वोत्तम खेळावर महाराष्ट्र महिला कबड्डी संघाने बुधवारी ३६ व्या नॅशनल गेम्समध्ये शानदार विजयी हॅट्रिक साजरी केली. स्नेहल शिंदे च्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र संघाने गटातील तिसऱ्या सामन्यात बिहार टीमला धूळ चारली. महाराष्ट्र संघाने ३६-२० दणदणीत विजयाची नोंद केली. या सलग तिसऱ्या विजयासह महाराष्ट्र महिला संघाने उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला. आता महाराष्ट्र संघाला पदकाचा पल्ला गाठण्याची मोठी संधी आहे. दुसरी कडे महाराष्ट्र पुरूष कबड्डी संघाला गटाच्या तिसऱ्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, तरी संघाला उपांत्य फेरीची संधी मिळाली आहे.
बुधवारी गटातील तिसऱ्या सामन्यांमध्ये महाराष्ट्र आणि बिहार महिला संघ समोरासमोर होते. महाराष्ट्र संघाने दमदार सुरुवात करत पहिल्या हाफ मध्येच महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली. या दरम्यान सोनाली शिंदे, स्नेहल सायली,पूजा यांनी सर्वोत्तम खेळी केली. त्यामुळे महाराष्ट्राला झटपट मोठी आघाडी घेता आली. सोनालीने चुरशीची खेळी करताना बोनसने महाराष्ट्राच्या खात्यावर गुणांची नोंद केली. त्यामुळे सामन्यामध्ये महाराष्ट्राला आपले वर्चस्व कायम ठेवता आले. (National Games Gujarat 2022)
महाराष्ट्र महिला संघातील सर्वच खेळाडूंची कामगिरी सर्वोत्तम ठरली. त्यामुळे आम्हाला तिसरा विजय साजरा करता आला. आता महाराष्ट्र संघ उपांत्य फेरीचा सामना जिंकून किताबाच्या लढतीसाठी दावेदार ठरत आहे. यातून महाराष्ट्राला निश्चितपणे पदकाचा पल्ला गाठता येईल, असा विश्वास महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक संजय मोकळ यांनी व्यक्त केला. (National Games Gujarat 2022)
महाराष्ट्र महिला संघाची कामगिरी कौतुकास्पद ठरत आहे. जेतेपदाचा बहुमान मिळवण्यासाठी महिला संघ आगेकूच करताना दिसतो. आता उपांत्य फेरी गाठून महाराष्ट्र संघाने आपले पदक जवळपास निश्चित केले आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सचिव नामदेव शिरगावकर यांनी विजयानंतर दिली.
महाराष्ट्र पुरूष कबड्डी संघाच्या विजयी मोहिमेला बुधवारी 36 व्या नॅशनल गेम्स मध्ये ब्रेक लागला. महाराष्ट्र संघाला गटातील तिसऱ्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. सर्विसेस संघाने रंगतदार सामन्यामध्ये महाराष्ट्राचा पराभव केला. सेनादल संघाने ४८-३८ अशा गुणांनी सामना जिंकला. त्यामुळे महाराष्ट्राला दहा गुणांच्या पिछाडीने पराभवाचा सामना करावा लागला.