नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
शिवसेनेच्या नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते बाबुराव आढाव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन आढाव यांचा सत्कार करण्यात आला. आढाव यांच्या नियुक्तीमुळे परिसरातील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
बाबुराव आढाव हे नाशिकरोड परिसरातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहे. यापूर्वी त्यांनी नाशिक शिक्षण मंडळाचे दोनवेळा सदस्यपद भुषविले आहे. त्यांच्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी अन् दाखविलेला विश्वास आढाव निश्चित सार्थ ठरवतील असा विश्वास शहर पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. आढाव यांच्या निवडीचे पालकमंत्री दादा भुसे, संपर्क नेते राजु अण्णा लवटे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, खासदार हेमंत गोडसे, माजी नगरसेवक रमेश धोंगडे आदींनी स्वागत केले आहे. दरम्यान आढाव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नागपूर येथे शिवसेनेत प्रवेश केला होता. नियुक्ती विषयी प्रतिक्रिया देताना बाबुराव आढाव म्हणाले की, नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघ शिवसेनेचा बालेकिल्ला करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विचार अन् विद्यमान युती सरकारच्या विविध योजनांची माहिती घरोघरी पोहचविण्यासाठी प्रयत्न केले जातील. पक्षाने दाखविलेला विश्वास निश्चितच सार्थ ठरविला जाईल.