Latest

Nashik News : ड्रग्ज विरोधात ठाकरे गटाचा आज मोर्चा, संजय राऊत करणार नेतृत्व

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; एम.डी. ड्रग्ज प्रकरणामुळे देशात चर्चेत आलेल्या नाशिकला ड्रग्जमाफियांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी तसेच वाढती बेरोजगारी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)तर्फे खा. संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (दि.२०) सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.

ठाकरे गटाचे नेते खा. राऊत, सुषमा अंधारे यांनी या प्रकरणात पालकमंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. धार्मिक आणि सुसंस्कृत शहर अशी ओळख असलेल्या नाशिकची ड्रग्ज प्रकरणामुळे देशभरात नाचक्की होत आहे. शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ड्रग्जच्या जाळ्यात ओढण्यात आल्याचे समोर येत आहे. त्यामुळे नाशिकला ड्रग्जमाफियांच्या विळख्यातून बाहेर काढून 'ड्रग्जमुक्त नाशिक' घडविण्यासाठी ठाकरे गटाने कंबर कसली असून, त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयावर या आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

मोर्चा शालिमार चौक येथील शिवसेना (ठाकरे गटा)च्या मध्यवर्ती कार्यालयापासून इंदिरा गांधी पुतळामार्गे हनुमान मंदिर, नेपाळी कॉर्नर, शिवाजी रोड, गाडगे महाराज पुतळा, वंदे मातरम‌् चौक, रविवार कारंजा, रेडक्रॉस सिग्नल, एमजी रोड, मेहेर सिग्नल मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नेण्यात येणार आहे.

या मोर्चात उपनेते बबन घोलप, सुनील बागुल, अद्वय हिरे, संपर्कप्रमुख जयंत दिंडे, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, नितीन आहेर, गणेश धात्रक, कृणाल दराडे, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वंसत गिते, माजी महापौर विनायक पांडे, माजी मनपा गटनेते विलास शिंदे, माजी आमदार योगेश घोलप, माजी नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, उपजिल्हाप्रमुख देवानंद बिरारी, महेश बडवे, बाळकृष्ण शिरसाठ, विक्रम रंधवे, नदिम सय्यद आदी पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

'ड्रग्जमुक्त नाशिक'साठी शिवसेना (ठाकरे गटा)तर्फे या विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात जिल्ह्यातील शिवसेना, सर्व अंगीकृत संघटना, पदाधिकारी, शिवसैनिक व नाशिककर जनतेने सहभागी व्हावे.

– सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख, शिवसेना

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT