नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लहानपणापासून ती ज्याला वडिल म्हणत होती, तो तिचा अपहरणकर्ता होता. मात्र ही बाब समजण्यासाठी दहा वर्षांचा कालावधी लोटला. पोलिसांनी कारच्या अपहार प्रकरणी अटक केलेल्या संशयिताने दिलेल्या कबुलीतून 'ति'च्या अपहरणाचा गुन्हा उघडकीस आला. त्यामुळे पोलिसांनी साक्री तालुक्यातून पालकांना बोलवून मुलीचा ताबा मुळ पालकांना सोपवला.
सप्तश्रृंगी गडावर एक मुलगी एका इसमासह फिरत असल्याची माहिती वणी पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तपास करीत चंडीकापुर शिवारातील जंगलातून दोघांना ताब्यात घेतले. अनिल अंबादास वैरागर (रा. ता. नेवासा, जि. अहमदनगर) व रुपाली अशी दोघांची नावे होती. दोघांकडे एक कार होती. पोलिसांनी कारबाबत चौकशी केल्यानंतर अनिलने ती कार आपली नसल्याचे सांगितले. तो दोन वर्षांपासून पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील वाघाळी येथे राहत होता. तेथील लक्ष्मण तांबे यांच्याकडे काही दिवसांपासून तो कारचालक म्हणून जात असल्याचे त्याने सांगितले. तांबे यांना रुग्णालयात सोडल्यानंतर त्याने कार व कारमधील ५० हजार रुपये घेऊन पळ काढल्याची कबुली दिली. याप्रकरणी शिक्रापुूर पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात अपहाराचा गुन्हा दाखल आहे. दरम्यान, पोलिसांनी रुपालीकडे चौकशी केली असता तिने अनिल हे माझे वडील असल्याचे सांगितले. मात्र पोलिसांना याबाबत संशय आला. त्यामुळे त्यांनी अनिलकडे चौकशी केली असता त्याने रुपालीचे सुमारे १० वर्षांपूर्वी धुळे जिल्ह्यातील साक्री येथून अपहरण केल्याची कबुली दिली. त्यामुळे वणी पोलिसांनी तातडीने साक्री येथील पोलिस पाटील, सरपंच यांच्याशी संपर्क साधून रुपालीच्या आईचा शोध घेतला. रुपालीचे आई व इतर नातलगांनी वणी पोलिस ठाण्यात येऊन रुपालीचा ताबा घेतला. आपल्या आई व मामाला पाहून रुपालीच्या तसेच पोटच्या मुलीला पाहून आईच्या डोळ्यात आनंदाश्रू तराळले. आपण ज्यास वडिल म्हणत होतो त्याने आपल्या आई वडिलांपासून ताटातूट केल्याचे रुपालीस समजले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वणीचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील पाटील, उपनिरीक्षक विजय कोठावळे, नाइक वसंत साबळे, शिपाई सुनील ठाकरे, दीपक गवळी, तारा बागुल यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
संशयित अनिल हा ३४ वर्षीय असून रुपाली १६ वर्षांची आहे. ती लहानपनापासून अनिलला वडिल म्हणत होती. मात्र दोघांच्या वयातील फरक पाहून पोलिसांना संशय आलेला. त्यामुळे त्यांनी अनिलकडे सखोल चौकशी केल्यानंतर अपहरणाचा गुन्हा उघड झाला. अनिलचे आई वडिल कामानिमित्त साक्रीकडे गेले हाेते. त्यावेळी अनिल व रुपालीच्या कुटूंबियांत ओळख झाली. त्यानंतर अनिलने सहा वर्षाच्या रुपालीचे अपहरण केले होते. लहानपणापासून रुपाली अनिलसोबत असल्याने ती त्याला वडिलच समजत होती.
हेही वाता :