Latest

Nashik News : गोळ्या झाडा पण, कांदा निर्यातबंदी उठवा ; मंत्री भारती पवारांच्या घरावर मोर्चा

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- केंद्र सरकारने लागू केलेल्या कांदा निर्यातबंदी विरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. प्रहार संघटनेने रविवारी (दि.१०) केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या नाशिकमधील घरावर 'डेरा डालो' मोर्चा काढला. चांदवडवरुन दुचाकीवरून निघालेल्या या मोर्चेकऱ्यांना शहर पोलिसांनी अशोक स्तभ परिसरात अडवले. 'साहेब, आमच्यावर लाठिचार्ज करण्यापेक्षा थेट गोळ्याच घाला. आमचे आई- वडील तुम्हाला विचारायलाही येणार नाहीत.' असे बोलून मोर्चेकऱ्यांनी त्यांची व्यथा पोलिसांसमोर मांडली.

कांदा निर्यातबंदीच्या विरोधात बाजार समित्यांनी तीन दिवसांपासून बंद पुकारला असून जिल्ह्यातील १७ पैकी १४ बाजार समित्यांमध्ये लिलाव झालेले नाहीत. निर्यात बंदी मागे घ्यावी, यासाठी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांच्या नेतृत्त्वाखाली रविवारी (दि.१०) नाशिकमध्ये मोर्चा काढण्यात आला. दुचाकीवरुन येत डॉ. पवार यांच्या निवासस्थानाजवळ डेरा टाकण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला. मात्र पोलिसांनी त्यांना अशोकस्तंभ परिसरात बॅरकेडींग करून अडवले. शेतकऱ्यांनी रस्त्यातच ठिय्या मांडला. वर्षभर काबाडकष्ट करुन पिकवलेला कांदा विकायची वेळ आली की सरकार निर्यातबंदी सारखा घातक निर्णय घेते. मग आम्ही कर्ज फेडायचे कसे. बाजार भाव पडल्यानंतर सरकार मदत का करत नाही, असा प्रश्न निंबाळकर यांनी यावेळी केला. शेतकरी म्हणून एखादी गोष्ट घ्यायला गेलो तर करमुक्त दिली जात नाही. शेतमालाला भाव नाही म्हणून शेतकरी आता शहरात मोलमजूरी करायला येत आहेत. आम्ही सुरक्षित नाही तर येथे कुणीच सुरक्षित राहणार नाही. शेतकरी असलो म्हणून काय झाले आम्हाला नक्षलवादी व्हायला भाग पाडू नका असा इशारााही निंबाळकर यांनी दिला. शेतकऱ्यांनी डॉ. पवार यांच्या निवासस्थानी जाण्याचा आग्रह धरल्यानंतर पोलिसांनी शेतकरी व डॉ. पवार यांचे फोनवरून संवाद करून दिला. तसेच डॉ.पवारांचे स्विय सहायक मनोज बेलदार व जिल्हा उपनिबंधक फैयाज मुलानी यांनी शेतकऱ्यांची भेट घेत त्यांचे म्हणणे ऐकूण घेतले व त्यांचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर मोर्चेकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसले. येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रहारच्या वतीने जिल्हाधिकारी व केंद्रीय राज्यमंत्री डॉ.पवार यांच्या नावे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी सुरेश उशिर, प्रकाश चव्हाण, हरिभाऊ सोनवणे, गणेश काकुळते, समाधान बागल, बापू शळके, महेश ठाकरे आदी उपस्थित होते.

डॉ. भारती पवार यांचा भ्रमणध्वनीवरून संवाद

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांनी मोर्चेकऱ्यांशी फोनवरून संवाद साधत निर्यातबंदी मागे घेण्यासाठी प्रयत्नशील असून याबाबत केंद्रीय कृषिमंत्री यांच्याशी चर्चा करणार असल्याची ग्वाही शेतकऱ्यांना दिला. यावेळी डॉ. पवार यांच्या स्वीय सहायकांनी निवेदन स्विकारल्यानंतर मोर्चेकरी मागे हटले. सुमारे दोन तास शेतकऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या दिला होता.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT