गंगापूर धरण, नाशिक 
Latest

Nashik News : पाणीकपातीच्या संकटातून नाशिककरांना अल्पसा दिलासा

गणेश सोनवणे

नाशिक: पुढारी वृत्तसेवा

परतीच्या जोरदार पावसाने नाशिकच्या धरणांमधून होणाऱ्या विसर्गामुळे मराठवाड्यातील जायकवाडी धरणातील जलसाठा ३८ टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे आता गंगापूर धरण समुहात ६१ टक्क्यां एेवजी ७४ टक्के जलसाठा ठेवण्याची मुभा मिळणार असल्याने पाणीकपातीच्या संभाव्य संकटातून नाशिककरांना अल्पसा दिलासा मिळाला आहे. 'परतीचा पाऊस असाच सुरू राहू दे, पाणीकपातीचे संकट टळू दे', अशी विनवणी नाशिककर गणरायाला करीत आहेत. (Nashik News)

संबधित बातम्या :

राज्यातील काही भागात ओला दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण करणारा पाऊस धरणांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नाशिकवर यंदा मात्र रूसून बसला. संपूर्ण आॉगस्ट महिना कोरडा गेल्यानंतर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पाऊस पुन्हा गायब झाला. आता अखेरच्या टप्प्यात पावसाने हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील जलसाठा ९७ टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणांतून विसर्ग सुरू आहे. त्यामुळे आतापर्यंत नाशिकमधून ११ टीएमसी पाणी जायकवाडी धरणात पोहोचले आहे. त्यामुळे धरणातील जलसाठा सोमवारी(दि.२५) ३८ टक्क्यांवर गेला आहे. समन्यायी पाणी वाटपानुसार जायकवाडीतील हा साठा ३७ टक्कयांपर्यंत राहिल्यास गंगापूर धरण समूहात ६१ टक्के, दारणा धरण समूहात ६४ टक्के तर पालखेड धरण समूहात ७३ टक्के जलसाठा ठेवून उर्वरीत पाणी जायकवाडीसाठी सोडावे लागेल. दुसऱ्या पर्यायानुसार जायकवाडीत ५४ टक्के जलसाठा झाल्यास गंगापूर धरण समूहात ७४ टक्के, दारणा धरण समूहात ८४ टक्के तर पालखेड धरण समूहात ७३ टक्के जलसाठा ठेवून उर्वरीत पाणी जायकवाडीत सोडावे लागेल. तिसऱ्या पर्यायानुसार जायकवाडीत ६५ टक्के जलसाठा झाल्यास गंगापूर धरणसमुहात ८२ टक्के, दारणात १०० टक्के तर पालखेडमध्ये ८२ टक्के जलसाठा ठेऊन उर्वरीत पाणीसाठा मराठवाड्याकरीता सोडावा लागेल. गेल्या आठवड्यामध्ये जायकवाडीत सुमारे ३३ टक्के जलसाठा होता. मात्र गणरायाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर जलसंकट काहीसे दूर झाले असून मागील चार दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे गंगापूर धरण समूहातून सातत्याने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. (Nashik News)

गतवर्षी जायकवाडीत ९९ टक्के साठा

गतवर्षी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे २५ सप्टेंबर २०२२ रोजी जायकवाडी धरणात ९९ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे नाशिकमधील धरणांतून मराठवाड्यासाठी अतिरीक्त पाणी सोडण्याची वेळ आली नव्हती.

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांतील जलस्थिती

धरण       क्षमता (दशलक्ष घनफुट मध्ये)      साठा (कंसात टक्केवारी)

गंगापूर            ५६३०                                   ५४५१ (९७)

कश्यपी            १८५२                                   १६९९ (९२)

गौतमी            १८६८                                   १७५५ (९४)

दारणा             ७१४९                                    ७१४९ (१००)

मुकणे             ७२३९                                    ६४९५ (९०)

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT